आपत्ती व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे फुलसावंगीत कोरोना रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:12+5:302021-04-08T04:41:12+5:30
ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ...
ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. परिणामतः रुग्ण वाढत आहेत. शेजारच्या जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास येथेही लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा बडगा उभारण्याची गरज आहे.
मागील वर्षी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना गावाच्या बाहेर ठेवण्यासाठी गाव डोक्यावर घेणारे काही बोलबच्चन ग्रामपंचायतीच्या सत्तेत जाताच मूग गिळून गप्प बसले आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीसुद्धा बेशिस्त नागरिकांवर कारवाईसाठी धजावत नाही. त्यामुळे जे लोक नियमांचे पालन करतात, त्यांनासुद्धा आपणच का नियम पाळायचे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी गावातील सुज्ञ नागरिक, ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, समन्वयाच्या अभावामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
बॉक्स
कर्मचाऱ्यांचे अपडाउन सुरूच
कोरोना काळातही ग्रामसेवक, तलाठी व पोलीस कर्मचारी यांचे पुसद, उमरखेडवरून येथे अपडाउन सुरू आहे. त्यामुळे गावातील बेशिस्त नागरिकांवर कुणाचाच वचक उरला नाही. ग्रामपंचायतीच्या सावध राजकारणामुळे गावाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. फुलसावंगीमध्ये वाढत असलेले कोरोना रुग्ण चिंतेचा विषय आहे. ग्रामपंचायतीने निर्बंध न पाळणाऱ्या नागरिकांवर दोन महिन्यांपासून कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य विजयराव महाजन यांनी सांगितले.