संशोधनात शिक्षकांचा सहभाग वाढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 09:45 PM2019-03-27T21:45:16+5:302019-03-27T21:45:44+5:30
संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएच.डी. अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर द्यावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) भारत सरकारचे माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएच.डी. अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर द्यावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) भारत सरकारचे माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी केले.
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला डॉ. मंठा यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. मंठा यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. शैक्षणिक प्रणालीचे बळकटीकरण, अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, संशोधन व विकास कार्य, आधारभूत सुविधा, विकासाभिमुख योजना, कॅम्पस ड्राईव्ह आदी घटकांवर समूपदेशन केले.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘नॅक’चे पाच वर्षांकरिता मानांकन मिळाले आहे. टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया हा बहुमानही महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे विचार संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांनी मांडले. डॉ. मंठा यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस तसेच संशोधन व विकास कार्यात लाभ होईल, असे ते म्हणाले.
प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांनी महाविद्यालयाची माहिती आणि विकास अहवाल मांडला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.