नेरमध्ये चिकनगुण्यासदृश आजाराच्या रुग्णात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:00 AM2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:17+5:30
गेली काही दिवसांपासून या प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगितले गेले. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्यांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये चिकनगुण्यासदृश आजाराची लक्षणे दिसून येत असल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच तालुक्यात चिकनगुण्यासदृश आजाराने कहर केला आहे. खरबी या गावात तर तब्बल २५ जणांना अशा प्रकारचा आजार झाला आहे. रुग्णांना चक्क हातावर उचलून रुग्णालयात न्यावे लागत आहे.
हातपाय दुखणे, बोटांना वेदना, चालता न येणे अशा प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण झपाट्याने वाढत आहे. ही लक्षणे प्रामुख्याने चिकनगुण्या या आजारात आढळून येतात. त्यामुळे लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
गेली काही दिवसांपासून या प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगितले गेले. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्यांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये चिकनगुण्यासदृश आजाराची लक्षणे दिसून येत असल्याचे सांगितले जाते.
सततच्या पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. त्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. संबंधित यंत्रणेकडून यावर उपाययोजना केली जात नाही. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकजण घरीच उपचार घेत असल्याची माहिती आहे. त्रास वाढल्यानंतरच रुग्णालयाची वाट धरली जात आहे.
खरबी या गावातील अतुल दैवत, बंटी राठोड, विजय राठोड, हिरासिंग राठोड, वनिता राठोड, गणेश आडे, रोहिदास राठोड, विमल मातने, ऋतिक राठोड, नभीबाई चव्हाण, कमला राठोड, वसंत राठोड, अक्षय राठोड यांच्यामध्ये चिकनगुण्यासदृश आजाराची लक्षणे दिसून आली आहे. एकाच गावात एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
रुग्णालयामध्ये चिकनगुण्यासदृश आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तपासणी अहवाल आल्यानंतरच या आजाराविषयी निश्चित सांगता येईल.
- डॉ. प्रतीक खोडवे, अधीक्षक, शासकीय रुग्णालय, नेर