पेट्रोल पंपाने पोलीस कल्याण निधीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:02 PM2017-12-04T22:02:07+5:302017-12-04T22:02:50+5:30
जिल्हा पोलीस दलाच्या कल्याण निधीसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या पुढाकारने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला.
सुरेंद्र राऊत ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या कल्याण निधीसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या पुढाकारने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला. यातून कल्याण निधी घसघशीत गंगाजळी जमा होत आहे. पोलिसांच्या पेट्रोलपंपाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्याकाठी दोन लाख लिटर पेट्रोल विक्रीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आता लवकरच गॅस एजन्सी सुरू केली जाणार आहे.
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पोलीस पेट्रोल पंपाचे फाईल पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी काही महिन्यातच निकाली काढले. १५ आॅगस्ट स्वातंत्र दिनाचा मुहूर्तावर हा पंप सुरू करण्यात आला. आॅगस्ट महिन्यातील १५ दिवसातच तब्बल ७२ हजार लिटर पेट्रोलची विक्री केली. त्यानंतर सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात प्रत्येकी एक लाख ५६ हजार लीटर तर नोव्हेंबर मध्ये एक लाख ८० हजार लिटर पेट्रोल विक्री केली. यातून महिन्याकाठी सर्व खर्च जाता साडेतीन लाखांचा नफा झाला. डिसेंबर महिन्यात दोन लाख लीटर पेट्रोल विक्रीचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. हा पंप जिल्हा वाहतूक शाखेच्या नियंत्रणात चालविण्यात येत आहे. पेट्रोल पंपाला जोड म्हणून गॅस एजन्सीचाही परवाना घेण्यात आला आहे. त्याकरिता एमआयडीसी परिसरात गोदाम शोधले जात आहे.
आता गॅस एजन्सीलासुध्दा मान्यता मिळाली असून काही जुजबी सोपस्कार पूर्ण केल्यानंतर कार्यान्वित केली जाणार आहे. या दोन्ही व्यवसायातून पोलिसांना हक्काचा निधी उभारता येणार आहे. ही दीर्घकालीन उपाययोजना जिल्हा पोलीस दलासाठी हितावह ठरणार आहे.
मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ब्रेक
पोलीस कल्याण निधीसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जात होते. या कार्यक्रमाचे तिकीट विक्री करण्याकरिता पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात येत होते. यातून अनेक गैरप्रकार झाल्याची उदाहरणे आहेत. शिवाय ही पध्दत पोलिसांची सामजिक प्रतिमा मलीन करणारी होती. त्यामुळेच जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून यवतमाळातच रूजू होताच एम. राज कुुमार यांनी पेट्रोल पंपाचे फाईल बाहेर काढले. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून अल्पावधीतच हा पंप सुरू करून घेतला.