उमेदवारीवरून नेत्यांची वाढली डोकेदुखी
By Admin | Published: January 25, 2017 12:39 AM2017-01-25T00:39:26+5:302017-01-25T00:39:26+5:30
सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे.
जिल्हा परिषद : उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग
पुसद : सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी पुसद तालुक्यातील गट व गणासाठी पक्षांतर्गत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपली प्रतिष्ठा व तुल्यबळ दाखवून आपली उमेदवारी फिक्स करण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
केवळ उमेदवारी मागणी झाली असून अद्यापपर्यंत कुणालाही तिकीट घोषित झाले नाही. परंतु नागरिकांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. पक्ष कोणाची उमेदवारी निश्चित करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक उमेदवार झाल्याने मतदारांच्या संपर्कात येत आहेत. मात्र अद्यापपर्यंत युती आघाडी झाली नसून इच्छुक उमेदवारीचे बाशिंग बांधून बसले जरी असले तरी पण बोहल्यावर कोण बसेल याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मात्र गत जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत विकासाच्या आराखड्यानुसार समाधानकारक विकास झाला नाही. फक्त आश्वासनाचा भडिमार कामे मात्र कमी असून रस्ते, पाणी व मूलभूत योजनेपासून मतदार वंचित आहे. सुशिक्षित नागरिक व तरुण वर्गात विकास कामांची चर्चा, उच्च शिक्षित तरुण वर्गातील उमेदवार दिल्यास राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रवर्गातील प्रभावी उमेदवाराच्या शोधात पक्ष आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मतदार व राजकीय पक्ष सद्यस्थितीत उमेदवारीवरून इच्छुकांची भलीमोठी यादी असूनही गोंधळात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. गट-गणामधील विजय प्रतिष्ठेचा झाल्यामुळे सत्ताधारी, विरोधी पक्ष, नेते, प्रमुख राजकीय पक्षांचे पुढारी यांचा उमेदवारी शोधता शोधता चांगलाच कस लागत आहे. सध्यातरी उमेदवारी कोणाला निश्चित होते व कोण बाजी मारून जातो, याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडोबा आपली वेगळी चूल मांडून शकतात. यामुळेही पक्ष प्रमुख चिंतेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)