215 रुपये वाढविले, अन् 10 रुपये कमी केले, व्वा रे चलाखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 05:00 AM2021-04-03T05:00:00+5:302021-04-03T05:00:06+5:30
गॅस सिलिंडरच्या किमती सारख्या वाढत आहेत. प्रत्येक महिन्याला त्याच्या दरामध्ये ५० ते १०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याच्या किमती दहा रुपयाने कमी करण्यात आल्या आहेत. मुळात गॅस सिलिंडर सहा महिन्यांमध्ये २१५ रुपयांनी वाढले आहे. यात दहा रुपये कमी केल्याचा दिखावा करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘अच्छे दिन’ येतील अशा केवळ वावड्या उठविण्यात आल्या. प्रत्यक्षात महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की सर्वसामान्याला प्रत्येक गोष्ट अवघड झाली आहे. गॅस सिलिंडर १० रुपयाने स्वस्त केल्याची घोषणा केंद्रातून झाली. प्रत्यक्षात वर्षभरात गॅसच्या किमती २१५ रुपयांनी वाढल्या आहेत. यामध्ये १० रुपयांची कपात करून दिखावा करण्यात आला आहे.
काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका कॅच करण्यासाठी हा सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे. यामुळेच सर्वसामान्य कुटुंबातून गॅस सिलिंडरच्या दराबाबत तिखट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. मध्यंतरी गॅसची सबसिडीच जमा झाली नाही. आता दरात कपात करून कुठला फायदा, हा प्रश्नच आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी गॅसच्या किमती पूर्वीप्रमाणे कमी कराव्यात, त्यावर मोठ्या प्रमाणात सबसीडी देण्याची नितांत आवश्यकता आहे.
गेल्या वर्षभरात २१५ रुपयांनी महाग झाले गॅस सिलिंडर
गॅस सिलिंडरच्या किमती सारख्या वाढत आहेत. प्रत्येक महिन्याला त्याच्या दरामध्ये ५० ते १०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याच्या किमती दहा रुपयाने कमी करण्यात आल्या आहेत. मुळात गॅस सिलिंडर सहा महिन्यांमध्ये २१५ रुपयांनी वाढले आहे. यात दहा रुपये कमी केल्याचा दिखावा करण्यात आला आहे.
सरकारने केरोसीन बंद केले आहे. जळतनावर बंदी आहे. अशा परिस्थितीत उज्ज्वला गॅस घरोघरी पोहोचला. त्यावेळी मनाला दिलासा वाटला होता. गॅसची सबसिडी खात्यात जमा होणार होती. प्रत्यक्षात गॅसच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गॅस विकत घ्यावे की धान्य, असा प्रश्न आहे.
- उषा राजेंद्र लाडेकर, गृहिणी
सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक गृहिणीपुढे गॅसच्या वाढलेल्या दराने प्रश्न निर्माण केला आहे. आमच्याकडे तर मेसचा व्यवसाय आहे. मेसच्या डब्यात आता गॅस दरवाढीने भडका उडविला आहे. महागाई सारखी वाढत आहे. तेलाचे दरही वाढले आहेत. अशा परिस्थितीत काम करायचे तरी कसे, असा प्रश्न आहे.
- नलिनी सतीश गिरी, गृहिणी
डाळीच्या किमती वाढल्या, मिरचीचे दर वाढले, तेलाच्या किमती वाढल्या. आता गॅसच्या किमती वाढल्या. त्यात दहा रुपये कमी केले. यात काय मोठी गोष्ट? आमच्यासारख्या कुटुंबाला गॅस खरेदी करणे अवघड बाब झाली आहे. सरकारने गॅसच्या किमती नियंत्रणात आणण्याची नितांत गरज आहे.
- पल्लवी प्रशांत वानखडे, गृहिणी