यवतमाळ जिल्ह्यात कर्जबाजारीपणामुळे बैलांची विक्री वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:31 AM2018-04-09T11:31:53+5:302018-04-09T11:32:01+5:30
शेतकऱ्यांना बैलजोडी सांभाळणेही अवघड झाले आहे. यामुळे जीवापाड जपलेली सर्जाराजाची जोडी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एप्रिलमध्ये बैलबाजारात बैलांची संख्या वाढली आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सरकारने कर्ज माफ केले, पण खात्यात खडकूही नाही. नाफेडला शेतमाल विकला. चुकाऱ्याचा अजून पत्ता नाही. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासोबत वैरण टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्यांना बैलजोडी सांभाळणेही अवघड झाले आहे. यामुळे जीवापाड जपलेली सर्जाराजाची जोडी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एप्रिलमध्ये बैलबाजारात बैलांची संख्या वाढली आहे. खरेदीदाराच्या तुलनेत विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. यामुळे किमती घसरल्या आहेत.
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण केली आहे. त्यातून बाहेर पडणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अवघड झाले आहे. घरात पीक नाही, शेतमालास दर नाही आणि विकलेल्या शेतमालाचे पैसे मिळाले नाही. गावात पिण्याच्या पाण्याची भीषण स्थिती आहे. चाºयाचाही गंभीर प्रश्न आहे. शिवाय कर्जाची परतफेड करायची आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बैलजोड्या आणि दुधाळ जनावरे विक्रीकरीता काढली आहेत.
दुष्काळी स्थितीत विक्रीस निघालेल्या बैलजोडीच्या किमती घसरल्या आहेत. ६० ते ७० हजार रूपये किमतीच्या बैलजोडीला सध्या ३० ते ४० हजार रूपयापर्यंतचेच दर आहे. प्रत्येक गावातून किमान आठ ते दहा शेतकऱ्यांच्या बैलजोड्या आल्या आहेत. अशीच स्थिती दुधाळ जनावरांची आहे. जनावराला पाहिजे तशी किंमत मिळत नाही, असे मत सावरचे शेतकरी देविदास संगेवार आणि यावलीचे बाबाराव गाडगे यांनी व्यक्त केले. काही शेतकऱ्यांनी तूर नाफेडला विकली. पण पैसे मिळाले नाही. यामुळे कर्ज परतफेडीसाठी बैलजोडी विकत असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. योगेश राजूरकर, मधुकर मछिंदे्र, राजू सातफळे, विठ्ठलराव थोटे या शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून पैशाची तजवीज केली.
प्रत्येक गावातून आले बैल
कर्जमाफी झाली, पण अजूनही खात्यात पैसे आले नाही. सावकाराच्या येरझारा सारख्या सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी अखेरचा पर्याय म्हणून बैलजोड्या विक्रीला काढल्या आहेत. याच प्रमुख कारणाने प्रत्येक गावातून बैलजोड्या विक्रीला येत आहे. त्यांची संख्या दररोज वाढत आहे.