शेतीत आधुनिक यंत्रांचा वाढतोय वापर
By admin | Published: April 17, 2017 12:25 AM2017-04-17T00:25:47+5:302017-04-17T00:25:47+5:30
बैलजोड्यांच्या वाढलेल्या किंमती, मजुरांची कमी झालेली संख्या व मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी आता शेतीसाठी...
मजुरांचा अभाव : पेरणी ते कापणी सर्वच यंत्रे बाजारात उपलब्ध, ट्रॅक्टरचा मोठा आधार
अखिलेश अग्रवाल पुसद
बैलजोड्यांच्या वाढलेल्या किंमती, मजुरांची कमी झालेली संख्या व मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी आता शेतीसाठी पारंपरिक अवजाराबरोबरच आधुनिक यंत्रण वापरावर भर देत आहे. आता बाजारात पेरणी ते कापणीपर्यंतची सर्वच यंत्रे बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहेत.
शेतीच्या कामासाठी बैलजोडीचा प्रामुख्याने वापर केला जातो. मात्र आता बांधापर्यंत शेती करण्याची पद्धत सुरू झाल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीत काम करणाऱ्या सालगड्याची कमतरता भासत असल्याने बहुतांश शेतकरी शेतीची कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यावर भर देत आहेत. मशागतीच्या कामापासून पेरणी, निंदणी, कापणी आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहेत. रोजंदारीची कामे करण्यास कोणी धजावत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेतात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. झटपधट कामे होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची खरेदी करून त्यावर मशागतीच्या कामासह पेरणी, डवरणी, कापणी, मळणीसाठी लागणाऱ्या उपकरणाची खरेदी केली जात आहे.
या उपकरणात पंजी, रोटाव्हेटर, फाळ, नांगर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, कापणी यंत्र यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने मशागतीची कामे करून शेतजमिनीचे सपाटीकरण केल जाते. त्यानंतर त्यावर पंजी करून सध्या यंत्राच्या सहाय्याने पेरणीसाठी मशागतीची कामे सुरू आहेत. बैलजोडीच्या सहाय्याने एक एकर जमिनीची मशागत करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो तसेच दोन मजूर लागतात. परंतु ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व कामे कमी वेळात झटपट होत असल्याने शेतात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. नांगरणीसाठी तेराशे व चौदाशे रुपये एकरी घेतले जात आहेत. यामुळे ट्रॅक्टर चालकांचा व्यवसाय तेजीत सुरू झाला आहे. ट्रॅकटरसाठी चार ते पाच दिवसांपूर्वी बुकींग करावी लागत आहेत. मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने सर्वच शेतकरी त्याचा वापर करीत असल्याने ट्रॅक्टर चालकाचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांनी सध्या नांगरणी करणे सुरू केले असल्याचे ट्रॅक्टर चालक सांगतात.