अवकाळी पाऊस बरसला

By admin | Published: March 17, 2017 02:49 AM2017-03-17T02:49:31+5:302017-03-17T02:49:31+5:30

ऐन गहू, हरभरा काढणीच्या वेळेस वातावरणात अचानक बदल होवून पुसद उपविभागात

Incredible Rain Rain | अवकाळी पाऊस बरसला

अवकाळी पाऊस बरसला

Next

शेतकरी चिंतेत : दिग्रस, पुसदला पाऊस तर उमरखेडमध्ये वारा
पुसद : ऐन गहू, हरभरा काढणीच्या वेळेस वातावरणात अचानक बदल होवून पुसद उपविभागात अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. महागाव तालुक्याला वादळी वाऱ्याने झोडपून काढले.
पुसद तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून यामुळे हरभरा, गहू, कांदा पीक, भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. यातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. ऐन तोंडावर आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला जातो की काय, या विवंचनेत शेतकरी आहे. गुरुवारी दुपारी पुसद परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. अनेकांचा कापलेला गहू, हरभरा शेतात आहे. तो ओला होण्याची भीती आहे, तर पुसद बाजार समितीतही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले धान्य उघड्यावर आहे. पावसामुळे ओले होण्याची भीती निर्माण झाली आहे.
दिग्रस तालुक्यात विजेच्या लखलखाटासह सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या. बुधवारी रात्रीपासूनच दिग्रस तालुक्यात काळे ढग दिसू लागले होते. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात पावसाच्या सरी कोसळल्या, तर सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या पावसाने गहू, हरभरा पिकांसोबतच संत्रा पिकाचेही नुकसान झाले.
महागाव तालुक्यात वादळी वारा सुरू असून पाऊस कोसळला नाही. परंतु केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातही दिवसभर ढगाळी वातावरण होते.
गेल्यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याची लागवड केली. परिसरातील विहिरींची पाणी पातळी चांगली होती. मात्र मार्च महिना सुरू होताच पाणी पातळी घटू लागली आहे. विहिरीनींही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करून रबी पिकांचे जतन करत आहेत. हवामान खात्याने काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तसेच पाऊस आल्यास या परिसरात रबी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांचेही नुकसान होवू शकते. सध्या गहू, हरभरा काढणीचे काम सुरू आहे. हाती आलेल्या पिकांचे नुकसान होवू होवू नये म्हणून शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत आहेत. सध्या ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवू शकते, असे शेतकरीवर्गातून बोलल्या जात आहे. (लोकमत चमू)

आंब्याला फटका
पुसद उपविभागात यावर्षी आंब्याचे मोठे पीक आले आहे. झाडाला आंबे लदबदले आहे. परंतु गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. अनेक ठिकाणी वादळाने आंबे गळून पडले आहे. तर काही ठिकाणी गारपिटीने आंब्याच्या फळाला मार लागल्याचे दिसत आहेत.

Web Title: Incredible Rain Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.