राज्यात आता उर्दू शाळांसाठी स्वतंत्र शिक्षण वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:48 AM2018-02-15T11:48:22+5:302018-02-15T11:50:18+5:30
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात यशस्वीपणे आयोजित करण्यात येत असलेल्या शिक्षणाच्या वारीत उर्दू शाळांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्याची दखल घेत यंदा खास उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र शिक्षणाची वारी भरविली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात यशस्वीपणे आयोजित करण्यात येत असलेल्या शिक्षणाच्या वारीत उर्दू शाळांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्याची दखल घेत यंदा खास उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र शिक्षणाची वारी भरविली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांत शिक्षणाच्या राज्यस्तरीय वारीचे तीन वेळा आयोजन करण्यात आले. पहिल्या वर्षी केवळ पुण्यात आयोजन झाल्याने अनेकांना सहभाग घेता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या वर्षी नागपूर, अमरावतीसह औरंगाबाद अशा ठिकाणी वारी भरविण्यात आली. तर तिसऱ्या वेळी नागपूर, अमरावती, लातूर आणि रत्नागिरी अशा चार शहरांमध्ये वारी आयोजित करून हजारो शिक्षकांना संधी देण्यात आली.
विशेष म्हणजे, या प्रत्येक वारीमध्ये राज्यातील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी वेगवेगळे प्रयोग सादर केले. परंतु, निकषांचा विचार करता हे स्टॉल पाहण्यासाठी उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना फार कमी संधी मिळाली. त्याची दखल घेत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला.
उर्दू शाळांसाठी स्वतंत्र शिक्षणाची वारी घेण्याचा आग्रह धरला होता. त्यावरून शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी पुण्याच्या विद्या प्राधिकरणाला याबाबत ८ फेब्रुवारीला निर्देश दिले. त्यानुसार, उर्दू शिक्षकांना वारीत सहभाग घेण्यासाठी प्राधिकरणाने ‘लिंक’ ओपन केली असून आॅनलाईन नोंदणीही सुरू केली आहे.
औरंगाबादकडे यजमानपद
उर्दू माध्यमाच्या शाळांची स्वतंत्र राज्यस्तरीय शिक्षणाची वारी आयोजित करण्यासाठी औरंगाबाद शहराची निवड करण्यात आली आहे. वारीचे यजमानपद सोलापूरला देण्याचाही विचार झाला होता. मात्र प्राधिकरणाने औरंगाबादची निवड केली असून मार्च महिन्याच्या प्रारंभी उर्दू शिक्षणाची वारी आयोजित केली जाणार आहे.