यवतमाळात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:19 AM2018-05-03T01:19:12+5:302018-05-03T01:19:12+5:30
महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवून विदर्भ राज्य आघाडीने सरकारच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकला. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींनी वेगळया विदर्भाचा ठराव घेतला. विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनावर बहिष्कार टाकून वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवून विदर्भ राज्य आघाडीने सरकारच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकला. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींनी वेगळया विदर्भाचा ठराव घेतला. विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनावर बहिष्कार टाकून वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले. सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.
स्थानिक नगरभवन परिसरातील लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळयाजवळ विदर्भवाद्यांनी आंदोलन केले. विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात स्वतंत्र विदर्भाचा ध्वज फडकविण्यात आला.
यावेळी विदर्भ आघाडीचे सचिव अॅड. अमोल बोरखडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद डफळे, अॅड. चंद्रकांत तिजारे, विदर्भ आंदोलन समितीचे दत्तात्रय चांदोरे, अस्थाई कामगार संघटनेचे विनोद झेंडे, अजगरभाई, जसवंत चिंडाले, किशोर मेश्राम, विजय निवल, किशोर परडखे, एस.जी. राऊत, रामदास सव्वालाखे, शरद उमक, प्रवीण भोयर, ज्ञानेश्वर बोरखडे आदी उपस्थित होते.
स्थानिक नेताजी चौकात विदर्भ संग्राम समिती, विदर्भ युवा संग्राम समिती आणि अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वात व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. १ मे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. विदर्भ वाद्यांनी उपोषण केले. नेताजी चौकात दिवसभर धरणे देण्यात आले. यावेळी माजी आमदार विजयाताई धोटे, अन्याय निवारण समितीच्या सचिव क्रांती धोटे, विदर्भ युवा संग्राम समिती अध्यक्ष लालजी राऊत, शेख जाकीर, गणेश कोसरकर, वैशाली पवार, डॉ. मुकुंद दंदे, डॉ. गणेश नाईक, कृष्णा परिपगार, ममता काळे आदी उपस्थित होते.