भारतीय हाॅर्नबील पक्ष्याची ख्याती गाजणार बँकॉकमध्ये
By अविनाश साबापुरे | Published: May 13, 2023 04:50 PM2023-05-13T16:50:27+5:302023-05-13T16:50:43+5:30
बँकॉक येथे २२ ते २४ मे दरम्यान त्यासाठी खास ‘आंतरराष्ट्रीय हाॅर्नबिल परिषद’ आयोजित करण्यात आली असून त्यात जगभरातील संशोधक हॉर्नबिलच्या विविध प्रजातीवर संशोधन मांडणार आहेत.
यवतमाळ : जगभरात झपाट्याने दुर्मिळ होत चाललेला पण मध्य भारताच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या हाॅर्नबिल या देखण्या पक्ष्याची ख्याती आता विदर्भातील अभ्यासक थेट थायलंडमध्ये मांडणार आहेत. बँकॉक येथे २२ ते २४ मे दरम्यान त्यासाठी खास ‘आंतरराष्ट्रीय हाॅर्नबिल परिषद’ आयोजित करण्यात आली असून त्यात जगभरातील संशोधक हॉर्नबिलच्या विविध प्रजातीवर संशोधन मांडणार आहेत.
विदर्भातील ज्येष्ठ पक्षी संशोधक, मध्य भारतातील हॉर्नबिल पक्षी प्रजातीचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. गजानन वाघ यांना परिषदेकरिता निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत संशोधन विद्यार्थी निखील बोरोडे आणि प्रतिक चौधरी तसेच वन्यजीव, पर्यावरण संवर्धन संस्थेचे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक किरण मोरे देखील सहभागी होणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील इंडियन ग्रे हॉर्नबिल (राखी धनेश) या पक्ष्यांचा विणीचा अभ्यास तसेच मध्यभारतातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात आढळणारा अतिशय दुर्मिळ मलबार पाइड हॉर्नबिल (मलबारी धनेश) या पक्ष्यांच्या प्रजातींचा विस्तार, विणीचा अभ्यास व विणीच्या हंगामातील खाद्य आदी विषयावर ते आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.
हॉर्नबिल पक्षी प्रजातींचे संशोधन, संवर्धन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, तसेच बदलत्या वातावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी हॉर्नबिल फाउंडेशनतर्फे दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉर्नबिल परिषद घेतली जाते. तीन दिवसाच्या परिषदेमध्ये ५० सादरीकरण आणि ४ बीजभाषण होणार आहेत. हॉर्नबिल संशोधनासंबंधी कार्यशाळेचेसुद्धा आयोजन केले जाणार आहे. जगप्रसिद्ध हॉर्नबिल तज्ञ प्रोफेसर डॉ. पिलाई पुनसवाड थायलंड, डॉ. लुसी केम्प आफ्रिका, डॉ. अप्रजीता दत्ता भारत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ. वाघ व त्यांचे संशोधन विद्यार्थी हॉर्नबिल संशोधनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर यावरील कार्यशाळेत भाग घेणार आहेत.
हाॅर्नबिलच्या जगात ५७ प्रजाती
जगात हॉर्नबिल पक्ष्यांच्या एकूण ५७ प्रजाती आहेत. त्यापैकी जवळपास ३२ प्रजाती आशिया खंडात व २५ प्रजाती दक्षिण आफ्रिका खंडातील देशांमध्ये आढळून येतात. भारतात यापैकी ९ प्रजाती आढळतात. तर महाराष्ट्रातील जंगलात ४ प्रजाती आढळतात. परंतु, मध्य भारतातील सातपुड्यातील जंगलात मात्र दोनच प्रजाती आढळतात. हॉर्नबिल पक्ष्यांच्या प्रजाती जंगलातील अनेक वृक्ष प्रजातींचा प्रसार करण्यात व नैसर्गिकरीत्या जंगल तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. अलीकडे जंगलतोड, फळझाडांची कमतरता, जंगलामध्ये मनुष्यांचा व गुरांचा वाढता वावर यामुळे या पक्ष्यांच्या प्रजाती झपाट्याने कमी होत आहेत.