भारतातला पहिला, जगातला नववा दुर्मीळ रक्ताचा रुग्ण आढळला यवतमाळात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 11:05 AM2023-11-01T11:05:24+5:302023-11-01T11:06:44+5:30

हृदयात ट्यूमर, डॉक्टरांनी दिले जीवदान : रुग्णाचेच रक्त वापरून करावी लागली शस्त्रक्रिया

India's first, world's ninth rare blood group patient found in Yavatmal! | भारतातला पहिला, जगातला नववा दुर्मीळ रक्ताचा रुग्ण आढळला यवतमाळात!

भारतातला पहिला, जगातला नववा दुर्मीळ रक्ताचा रुग्ण आढळला यवतमाळात!

यवतमाळ : जीवघेण्या आजाराचा रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचला अन् कळले की, त्याचा रक्तगट देशातच नव्हे, तर जगात दुर्मीळ आहे. आता शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले तीन युनिट रक्त आणायचे कोठून? डॉक्टरही हतबल झाले. रुग्णाचे तर त्राणच गळून पडले. पण, याही परिस्थितीत डॉक्टरांनी मार्ग काढला. शस्त्रक्रियाही केली अन् रुग्णाला जीवदानही दिले. होय, जगात दुर्मीळ असलेल्या रक्तगटाचा हा रुग्ण यवतमाळात आढळला अन् त्यांच्या केसमुळे मेडिकल सायन्सला उपचाराचा एक नवा पर्यायही सापडला.

अॅड. राजेश अग्रवाल असे या रुग्णाचे नाव आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या छातीत वेदना जाणवू लागल्या. म्हणून ते गावातल्याच एका दवाखान्यात गेले. ईसीजी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, हा अॅसिडिटीचा प्रकार असावा. पण, इको केल्यानंतर अग्रवाल यांच्या हृदयात काहीतरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते तडक मुंबईच्या लीलावती इस्पितळात गेले. तेथे ईसीजी, 'इको, एमआरआय केल्यानंतर अग्रवाल यांच्या हृदयात ट्यूमर असल्याचे निष्पन्न झाले. एंजिओग्राफी केल्यानंतर लक्षात आले की, त्यांच्या हृदयात भरपूर ब्लॉकेजेसही आहेत.

अग्रवाल कुटुंबीय घाबरून गेले. पण, डॉ. पवनकुमार यांनी सांगितले की, तातडीने शस्त्रक्रिया केल्यास सर्वकाही ठीक होईल. झाले, शस्त्रक्रियेची तारीख ठरली. त्यासाठी तीन युनिट रक्त लागणार होते. सर्व तयारी झाली. पण ऐनवेळी घात झाला. अॅड. राजेश अग्रवाल यांचा रक्तगट कुणाशीही मॅच होत नव्हता. घरातल्या सदस्यांसह जवळपास ५० जणांचा रक्तगट मॅच करून पाहण्यात आला. अग्रवाल यांचा रक्तगट 'गेरबिच फेनोटाइप' आहे आणि तो जगात अत्यंत दुर्मीळ आहे. त्यामुळे अग्रवाल यांच्या शस्त्रक्रियेसाठी तीन युनिट रक्त मिळण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यावर तोडगा म्हणून लीलावतीच्या डॉक्टरांनी अग्रवाल यांचेच रक्त वापरण्याचा पर्याय निवडला. त्यासाठी शस्त्रक्रिया महिनाभर लांबणीवर टाकण्यात आली. एकेक हप्त्याच्या अंतराने अग्रवाल यांच्या शरीरातून तीन युनिट रक्त संकलित करण्यात आले आणि २० ऑक्टोबरला शस्त्रक्रिया यशस्वी केली. आज अॅड. राजेश अग्रवाल हे हार्ट ट्यूमर आणि ब्लॉकेजेसमधून बरे होऊन घरी आराम करीत आहेत.

केसचे नेमके महत्त्व

  • गेरबिच फेनोटाइप (जीई : २, ३, ४) हा रक्तगट जगात दुर्मीळात दुर्मीळ प्रकारचा आहे.
  • अॅड. राजेश अग्रवाल यांच्या शरीरात हा रक्तगट आढळल्याने शस्त्रक्रियेवेळी त्यांना रक्त कुठून मिळवावे, हा प्रश्न निर्माण झाला.
  • कारण भारतात असा रक्तगट असलेले ते पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.
  • या रक्तगटाच्या जगात केवळ नऊ व्यक्तींच्याच आतापर्यंत नोंदी आहेत.
  • अॅड. राजेश अग्रवाल यांच्या केसच्या निमित्ताने दुर्मीळ रक्तगटाच्या प्रभावी संशोधनाची गरज प्रकर्षाने पुढे आली.

रक्तगट अचानक कसा बदलला?

अॅड. राजेश अग्रवाल यांचा रक्तगट मुळात एबी पॉझिटिव्ह होता. मात्र, शस्त्रक्रियेसाठी रक्तचाचणी केली तेव्हा त्यांच्या रक्ताशी कुणाचाही रक्तगट मॅच होत नव्हता. 'इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरन्स लेबॉरेटरी'च्या तपासणीनुसार त्यांचा रक्तगट आजारामुळे बदलून तो 'गेरबिच फेनोटाइप' असा दुर्मीळ झाला होता. हृदयातील ट्यूमरमुळे इम्यून कॉम्लेक्स रिलीज झाले आणि अग्रवाल यांच्या रक्तात येलो अँटी बॉडी तयार होत गेल्या, त्यातूनच त्यांचा रक्तगट बदलून गेरबिच फेनोटाइप बनला, असे डॉ. पवनकुमार यांनी सांगितले.

जगात केवळ ९ जणांमध्येच आहे हा रक्तगट

यवतमाळ येथील अग्रवाल यांच्या शरीरात आढळलेला रबिच फेनोटाइप' हा रक्तगट जगात केवळ ८ जणांच्या शरीरात आतापर्यंत आढळलेला आहे. यूकेमधील 'इंटरनॅशनल ब्लड ग्रुप रेफरन्स लेबॉरेटरीकडे केवळ या आठ जणांचीच नोंद आहे. आता अग्रवाल यांच्या निमित्ताने अशा रक्तगटाच्या नवव्या व्यक्तीची नोंद झाली आहे. ते भारतात या रक्तगटाचे एकमेव व्यक्ती आहेत.

राजेश अग्रवाल हे रबिच फेनोटाइप रक्तगट असलेले भारतातील एकमेव आणि जगातील नववे व्यक्ती आहेत. त्यांचा रक्तगट कुणाशीही जुळत नसल्याने आम्ही त्यांचेच रक्त वापरून शस्त्रक्रिया केली. या केसवरून इतर रुग्णांसाठी सांगावेसे वाटते की, कुणालाही हृदयाबाबत काही तक्रार जाणवत असेल तर तातडीने इको करून घ्यावे. रक्तगट तपासून पाहावा.

- डॉ. पवनकुमार, लीलावती हॉस्पीटल, मुंबई

सुरुवातीला मला वाटले होते की, मला अॅसिडिटीचा त्रास होतोय. पण, तपासणीनंतर माझ्या हृदयात साधारण गुलाबजामुनएवढ्या आकाराचा ट्यूमर असल्याचे कळले. त्यातच रक्तगट मॅच होत नसल्याने गुंतागुंत वाढली होती. पण, डॉक्टरांनी महत्प्रयासाने माझेच रक्त संकलन करून यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल ८-९ तसांच्या शस्त्रक्रियेने मला नवजीवन मिळाले आहे.

- अॅड. राजेश अग्रवाल, यवतमाळ

Web Title: India's first, world's ninth rare blood group patient found in Yavatmal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.