इंद्रायणी काठी लागली समाधी...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:00 AM2021-11-26T05:00:00+5:302021-11-26T05:00:35+5:30
बाबूजींच्या २४ व्या स्मृतिदिनािनिमित्त लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्या दोन गायकांनी आगळीवेगळी स्वरांजली अर्पण केली. पंजाबी संगीताचा बाज घेऊन अमृतसरहून आलेल्या हरगुण कौर यांनी सुरुवातीला डोक्यावर पदर घेऊन सादर केलेली प्रार्थना श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारी होती. तर पुढे कंबरेला पदर खोचून त्यांनी एकापेक्षा एक दणकेबाज सुफी गीतरचना सादर केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची...’
अशा अभंगांनी बुधवारची सायंकाळ यवतमाळकरांसाठी रम्य ठरली. निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहाचे. बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळावर ही संगीतमय स्वरांजली रंगली. बाबूजींच्या समाधीभोवती झुळझुळणारे कृत्रिम सरोवर, त्यात कोसळणारा कृत्रिम धबधबा अन् त्याच पाण्यात उभारलेल्या मंचावर प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि प्रसिद्ध गायिका हरगुण कौर यांचे गायन. बाबूजींच्या समाधीच्या सानिध्यात बसलेले हजारो श्रोते ‘इंद्रायणी काठी लागली समाधी’ हा अभंग ऐकताना इतके तल्लीन झाले जणू समाधी लागली.
बाबूजींच्या २४ व्या स्मृतिदिनािनिमित्त लोकमत सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्या दोन गायकांनी आगळीवेगळी स्वरांजली अर्पण केली. पंजाबी संगीताचा बाज घेऊन अमृतसरहून आलेल्या हरगुण कौर यांनी सुरुवातीला डोक्यावर पदर घेऊन सादर केलेली प्रार्थना श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारी होती. तर पुढे कंबरेला पदर खोचून त्यांनी एकापेक्षा एक दणकेबाज सुफी गीतरचना सादर केल्या. ‘मंगदा नसिबा कुछ और है... किस्मत पे किसका जोर है’ याच गाण्याचा धागा धरून त्यांनी लगेच ‘मिले हो तूम हम को, बडे नसिबो से’ आणि याच गाण्यातून पुन्हा ‘तेरी गलिया मुझको भावे’ अशी चमत्कृतीपूर्ण पेशकश केली.
हरगुण यांनी हळूच श्रोत्यांशी संवाद साधत आलाप घेतला आणि हे कोणते गाणे असा प्रश्न समोरच्या गर्दीला विचारला. गर्दीतून एकमुखी आवाज उमटला ‘एक हसीना थी, एक दिवाना था’... मग हरगुणच्या पहाडी स्वरात हे गाणे दणाणत असताना श्रोते अक्षरश: आपल्या मोबाईलचे दिवे पेटवून हात उंचावून डोलू लागले.
तर दुसरीकडे मराठी मातीचा शास्त्रीय सुगंध लेऊन प्रथमेश लघाटे यांनी नाट्यपद, अभंग, भावगीत सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. एकदंताय वक्रतुंडाय हे गणेशस्तवन, सुरत पिया की दिन बिसराई, घेई छंद मकरंद हे नाट्यपद लक्षवेधी ठरले.
‘बाजे रे मुरलीया बाजे
अधर धरे मोहन मुरलीधर
ओठ पर माया बिराजे’
या भजनाने तर प्रथमेशने यवतमाळकरांना जिंकूनच घेतले. मात्र जेव्हा कानडा राजा पंढरीचा या अभंगाची आळवणी सुरू झाली तेव्हा मैफलीत अनोखा रंग चढला. तब्बल तीन तास रंगलेल्या या मैफिलीचे सूत्रसंचालन प्रा. अजय आकोलकर यांनी केले.
विठ्ठल विठ्ठल ते अली अली
- संगीत ही संपूर्ण जगाला कळणारी भाषा आहे. जाती, धर्म बाजूला ठेवून आराधनेचा मार्ग आहे. याचाच प्रत्यय स्वरांजली कार्यक्रमात आला. प्रथमेश लघाटे यांनी माझे माहेर पंढरी, कानडा राजा पंढरीचा सारखे अभंग गाताना विठ्ठलाची आळवणी केली. तर हरगुण कौर यांनी आजा रे माही तेरा रस्ता वो देख दिया, दमा दम मस्त कलंदर अशा सूफी रचना पेश करताना ‘अली अली’ अशी आळवणी केली. या दोन्ही वेळेस यवतमाळकर प्रेक्षक सारख्याच तन्मयतेने गाण्याशी एकरूप झाले. हरगुण कौर यांच्या आवाजात अस्सल मराठी लोकगीत असलेला ‘आईचा गोंधळ’ ऐकताना मैफलीची उंच आणखी वाढली.
कलावंतांचा सन्मान
- मैफिलीच्या प्रारंभी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, सुनित कोठारी, किशोर दर्डा, पूर्वा कोठारी, सीमा दर्डा यांच्यासह गायक प्रथमेश लघाटे व हरगुण कौर तसेच त्यांच्या मातोश्री रवींद्रजी कौर यांनी प्रेरणास्थळावर दीपप्रज्वलन केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या समाधीपुढे नतमस्तक झाल्यानंतर स्वरांजली कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी गायिका हरगुण कौर यांच्या आई रवींद्रजी कौर यांचे पूर्वा सुनित कोठारी यांनी स्वागत केले. तसेच दोन्ही गायक व त्यांच्यासोबत असलेले वाद्यवृंद नंदू गोहणे, राजू गजभिये, रितेश तिवारी, रॉबीन विल्यम, श्रीधर कोरडे, प्रशांत नागमोते, रवी खंडारे, नरेंद्र कडवे, मयूर पटारी, स्मीत वंजारी यांचा किशोर दर्डा यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.