औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: November 1, 2014 11:13 PM2014-11-01T23:13:59+5:302014-11-01T23:13:59+5:30
उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम
चोरीच्या घटनांमध्ये वाढ : कामगारही करतात जोखीम स्वीकारून काम
सुहास सुपासे - यवतमाळ
उद्योगांमध्ये औद्योगिक सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. यासाठी उद्योग खात्याने नियमावली ठरवून दिली आहे. परंतु या नियमावलीचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. कामगारांना जोखीम स्वीकारून आपले काम करावे लागते.
यवतमाळ शहरात दोन औद्योगिक वसाहती आहेत. यातील अंतर्गत कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि मालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही सबंधित उद्योजकांकडेच असते. त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात शासनाची नियमावली आहे. त्यानुसार कामगारांसाठी काम करण्यास पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी जेवणाची जागा, स्वच्छ पाणी, शौचालय सोबतच जोखीमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी आवश्यक तो विमा आणि प्रत्यक्ष उद्योगामध्ये सुविधा आवश्यक आहे. यातील बहुतांश सोयीसुविधांची पूर्तता यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीमधील उद्योगांमध्ये होत असल्या तरी जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतींची मात्र खस्ता हालत आहे. वणीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग असताना त्या ठिकाणी मात्र कामगारांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने आवश्यक ते नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
याबाबत कर्मचाऱ्यांमध्येही एकजुटतेचा अभाव आणि स्वत:च्या सुरक्षिततेविषयी असलेली अनभिज्ञता कारणीभूत आहे. त्यामुळे इथे कामगारांच्या अपघातांची संख्यासुद्धा मोठी आहे. यवतमाळच्या औद्योगिक वसाहतीमध्ये चोरीच्या घटना मात्र नित्याच्याच झाल्या आहेत. तयार मालाची व इतर साहित्याच्या चोऱ्या या ठिकाणी नेहमीच होतात. उल्लेखनिय म्हणजे या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. अनेकवेळा जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर आजपर्यंत एकाही चोरीचा छडा लावण्यात आला नसल्याची माहिती एमआयडीसीचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा यांनी दिली.
यावर विचार होणे आवश्यक आहे. याबाबत एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला असता, आम्ही उद्योगांना केवळ जागा, विद्युत व पाणी उपलब्ध करून देतो. इतर बाबींशी आमचा काहीएक सबंध नसल्याचे सांगण्यात आले. उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची तसेच मालाची सुरक्षितता स्वत:च करायची असल्याचे एमआयडीसी कार्यालयाचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलीस चौकी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आली आहे. परंतु ही चौकी उभारण्यात आल्यानंतर चोरींच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाल्याचा आरोप उद्योजकांमधून करण्यात येत आहे. या चौकीचा फारसा उपयोग चोऱ्या रोखण्यात होतच नसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने पोलीस खात्याने विचार करण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरातील मोठे उद्योजक स्वत:च्या मालाची व कर्मचाऱ्यांची सुरक्षा स्वत: करण्यास सक्षम असतात. परंतु छोट्या उद्योजकांची मात्र चांगलीच कसरत होते. त्यादृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.