मिंधे सरकारमुळेच उद्योग गुजरातला; खासदार सावंत, दानवे यांनी डागली तोफ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:37 AM2023-01-10T11:37:02+5:302023-01-10T11:39:00+5:30
शिवसेनेच्या मोर्चाला विराट प्रतिसाद
यवतमाळ : खोक्यांच्या बळावर आमदारांची खरेदी करून बनलेले हे सरकार मिंधे आहे. यांच्यामुळेच राज्यातील अनेक उद्योग गुजरातला गेले आहेत. पंतप्रधान मोदीही देशाचे नव्हे तर गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत असल्याचे सांगत या मिंद्या सरकारला आता जनतेनेच धडा शिकवावा, अशा शब्दांत खासदार अरविंद सावंत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य शासनावर तोफ डागली.
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे, शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपयांचा हमीभाव द्यावा तसेच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानातून विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. सकाळी ११ पासूनच आझाद मैदान परिसरात शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली होती. दुपारी १:३०च्या सुमारास खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी मंत्री संजय देशमुख, संतोष ढवळे, माजी आमदार विश्वास नांदेकर, प्रवीण शिंदे, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, किशोर राठोड, माजी नगराध्यक्ष कांचनताई चौधरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा निघाला.
मोर्चात शेतकरी बैलगाडीवर आरुढ झाले होते, तसेच पारंपरिक वेशभूषा केलेल्या बंजारा समुदायातील महिलांचा सहभागही लक्षणीय होता. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातात राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविणारे फलक होते. मोर्चेकऱ्यांकडून भाजपासह शिंदे गटातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. हा मोर्चा पाचकंदील चौक, नेताजी चौक, दत्त चौक, बसस्थानक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सूत्रसंचालन प्रवीण पांडे यांनी केले.
शेतकऱ्यांचे जाहीर केलेले अनुदान गेले कुठे?
खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात भाजप-शिंदे गट सरकारवर हल्ला चढविला. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात आली. मात्र राज्यातील दहा टक्के शेतकऱ्यांनाही हे अनुदान मिळाले नसल्याचे ते म्हणाले.
राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापसाला भाव नाही. त्यात हे सरकार कापूस आयात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा घणाघातही सावंत यांनी आपल्या भाषणातून केला.
अतिवृष्टीचे पैसे नाहीत; पण ट्रेनसाठी सहा हजार कोटी
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. मुंबई-अहमदाबाद ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये या सरकारने वळते केले आहे. मात्र, अतिवृष्टीचे पैसे द्यायला मात्र चालढकल केली जात आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे ३७०० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील २२०० कोटी एकट्या विदर्भातील आहे. मात्र, त्यापैकी केवळ ७०० कोटी रुपये वाटप करण्यात आले. उर्वरित पैसा ट्रेनच्या नावाखाली गुजरातला पळविल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
सभेत संजय राठोड यांच्यावर बोचरी टीका
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निघालेल्या आक्रोश मोर्चात संजय राठोड टीकेचे लक्ष्य ठरले. खासदार सावंत यांनी राठोड यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. व्यासपीठावर संजय देशमुख बसले होते. त्यांचा उल्लेख करीत हा संजय सच्चा आहे, सोडून गेेलेला संजय लुच्चा होता, असे ते म्हणाले. यावेळी जमलेल्या हजारो मोर्चेकऱ्यांनी संजय राठोड यांच्या निषेधाचे नारे दिले. इतर नेत्यांच्या रडारवरही संजय राठोड राहिले. गद्दार गेले तरी शिवसेना थांबणार नाही, ती पुन्हा जोमात उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या 'या' मागण्यांचे दिले निवेदन
मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील एक लाख २८ हजार शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, २०१८ पासून बंद कृषी वीज जोडणी योजना तत्काळ सुरू करावी, पीक विमा लाभाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्यास समसमान द्यावी यासह इतर मागण्यांचा यामध्ये समावेश होता.