चोरीचे अर्धशतक करणारा कुख्यात ‘रंडो’ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 09:33 PM2020-01-10T21:33:37+5:302020-01-10T21:36:57+5:30
पंधराव्या वर्षापासून करतोय चोऱ्या
यवतमाळ: पुसदमधील तुकारामबापू वार्डातील कुख्यात चोरटा फिरोजखान उर्फ रंडो साहेबखान याला ५० चोऱ्यानंतर पोलिसांनी पकडले आहे. त्याच्यावर महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशात चोरीचे ५० गुन्हे दाखल आहे. त्याने केलेल्या चोरीमधील काही सोने पोलिसांनी पकडले आहे. तर काही सोने त्याने सराफा व्यावसायिकांना विकले आहे. या व्यावसायिकांचीही चौकशी पोलीस करणार आहे. अशा व्यावसायिकांवर गुन्हे नोंदविले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
रंडो साहेबखान हा आरोपी वयाच्या १५ व्या वर्षापासून चोरी करीत आहे. त्याने आतापर्यंत यवतमाळ, आर्णी, महागाव, वसंतनगर, दिग्रस, दारव्हा, कळंब, उमरखेड, मानोरा, हिंगोली, नांदेड, आंध्रप्रदेशात चोºया केल्या आहेत. त्याच्यावर यवतमाळात २२ गुन्हे नोंदविले गेले आहेत. तर २८ गुन्हे आदिलाबादमध्ये नोंदविण्यात आले आहे.
रंडो साहेबखान हा पुसद, हैद्राबाद आणि बुलडाणा अशा तीन ठिकाणी राहत होता. त्याला ज्या भागात चोरी करायची त्या ठिकाणी तो दुपारी १ ते २ च्या सुमारास पाळत ठेवायचा. ज्या घरांना कुलूप लागले आहे, अशा घरात रात्री चोरी करायचा. चोरीनंतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून विविध ठिकाणी वास्तव्याला राहत होता. अशा पध्दतीने त्याने ५० घरफोड्या केल्या आहेत.
रंडो शनिवारी ४ जानेवारीला वाशिम मार्गे पुसदला सोन्या, चांदीचे दागिने विक्रीकरिता येणार होता. याची माहिती पुसद पोलिसांना मिळताच त्यांनी भोजला टी-पॉइंटजवळ सापळा रचला. त्याला पकडण्यात आले. यावेळी त्याच्या जवळ सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम सापडली. वसंतनगर पोलिसांनी त्याच्यावर कलम ४५४, ३८० भांदविनुसार गुन्हा नोंदवून अटक केली.
पोलिसांनी हैदराबाद आणि चिखली येथून २९७ ग्रॅम सोन्याचे दागिने, २४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला. फिरोज खानकडून एकंदर १४ लाख ४५ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. इतर चोरीतील मालाची चौकशी पोलीस प्रशासन करीत आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, पुसदचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, गोपाल वास्टर, गजानन डोंगरे, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, दिगांबर पिलावन, नागेश वास्टर, पंकज बेले, प्रवीण कुथे यांनी केली.
चोरीच्या ‘सेंच्युरी’चा मनसुबा उधळला
वयाच्या पंधराव्या वयापासून चोरीच्या क्षेत्रात सराईत झालेल्या फिरोज खान उर्फ रंडो साहेबखान याला चोरीची सेंच्युरी पूर्ण करायची होती. अटकेनंतर पोलीस तपासात त्यानेच ही कबुली दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत सांगण्यात आली. चोरीचे शतक करण्याचा चोरट्याचा डाव मात्र पोलीस कारवाईमुळे आता उधळला गेला आहे.