खरिपात शेतकऱ्यांना महागाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:00 AM2022-04-07T05:00:00+5:302022-04-07T05:00:10+5:30
जिल्ह्यात आठ लाख ८० हजार हेक्टरवर खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी विविध बियाण्यांची मागणी कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे. येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील निम्मे अधिक क्षेत्र कापसाचे असणार आहे. कापसाचे दर वाढल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या वर्षी चार लाख ५५ हजार हेक्टरवर कापूस लागवडीचे प्रस्तावित नियोजन कृषी विभागाने केले आहे.
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यंदा कापसाला विक्रमी दर मिळाले आहेत. सध्या कापूस १२ हजार १०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. यामुळे कापसाचे लागवड क्षेत्रही ५० हजार हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे. खरिपासाठी दोन लाख अतिरिक्त पाकिटांची मागणी बियाणे कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे. २५ कंपन्या बियाणे विकण्यासाठी तयार आहेत. दुसरीकडे खताच्या किमतीही भडकल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या खरिपात शेतकऱ्यांना इतर संकटाबराेबरच महागाईसोबतही सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्यात आठ लाख ८० हजार हेक्टरवर खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी विविध बियाण्यांची मागणी कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे. येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील निम्मे अधिक क्षेत्र कापसाचे असणार आहे. कापसाचे दर वाढल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या वर्षी चार लाख ५५ हजार हेक्टरवर कापूस लागवडीचे प्रस्तावित नियोजन कृषी विभागाने केले आहे. हे क्षेत्र पाच लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
गतवर्षी चार लाख २० हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यासाठी २४ लाख ३० हजार १२२ पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. ४७५ ग्रॅमचे हे पाकीट गतवर्षी ७६७ रुपयांना मिळत होते. या वर्षी हे पाकीट ८१० रुपयांना मिळणार आहे. त्यामध्ये ४३ रुपयांची दरवाढ नोंदविण्यात आली आहे.
कापसाच्या खालोखाल सोयाबीनचे लागवड क्षेत्र आहे. या वर्षी दोन लाख ७३ हजार २३५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी ७४ हजार ३४९ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च बियाणे तयार केले आहे. यामुळे मागणी करण्यात आलेल्या बियाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
एकूणच खत आणि बियाण्यांच्या किमती वाढणार असल्याने येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणारा आहे. मजुरांच्या किमतीही वाढल्या आहेत. डिझेल, पेट्रोलचे दर वाढले आहेत. यामुळे शेतीची मशागतही वाढणार आहे. अशा स्थितीत निसर्गाचा प्रकोप आणि वाढत्या महागाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
आगीत तेल, केंद्राकडून सबसिडी हटविण्यासाठी हालचाली
- खत, बियाण्यांच्या किमती वाढण्याचा अंदाज असल्याने बाजारात खतच उपलब्ध नाही. ४८ हजार ८२२ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. जिल्ह्याने दोन लाख १५ हजार ३०० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली आहे. मात्र, कंपनीने खतांच्या बॅगा पाठविलेल्या नाहीत. खतनिर्मितीसाठी लागणारे सल्फ्युरिक ॲसिड महागले आहेत. याशिवाय केंद्राकडून सबसिडी कमी करण्याच्या हालचाली आहेत. यामुळे खताच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठेत आलेले २०:२०:०:१३ नावाचे खत १४७० रुपये दराने आले आहे. गतवर्षी या खताचे दर १२९० होते. १५:१५:१५: नावाचे खत १५०० रुपये बॅग प्रमाणे आहे. प्रत्येक रॅकमध्ये खताच्या दराच्या नव्या किमती पाहायला मिळत आहेत. डीएपी, एमओपी, एसएसपी खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ११ एप्रिलला दिल्लीत बैठक बोलविली आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन बॅग महागणार
- गतवर्षी सोयाबीन बियाण्याची बॅग ३ हजार रुपयांना होती. या वर्षी ही बॅग महागण्याचा अंदाज आहे. १५ एप्रिलनंतर सोयाबीनचे दर निश्चित होतील. या वर्षी एक लाख २४ हजार हेक्टरवर तुरीची लागवड होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र जास्त आहे. मात्र बियाण्याची किंमत कमी राहण्याची शक्यता आहे. यासोबतच सात हजार ५०० हेक्टरवर ज्वारी, चार हजार ५०० हेक्टरवर मूग, चार हजार २५० हेक्टरवर उडीद पिकाची पेरणी होण्याची शक्यता आहे.