वणीत सोयाबीन पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:23 AM2017-07-25T01:23:01+5:302017-07-25T01:23:01+5:30
सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे.
कृषी विभाग अनभिज्ञ : शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे. मात्र सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.
वणी तालुक्यात कपाशीसह सोयाबीन हे पीक प्रमुख पीक आहे. जुन महिन्यात लागवड झालेले पीक यावर्षी अनियमीत पावसामुळे व अळीच्या प्रादूर्भावामुळे प्रभावित झाले आहे. काही भागात जुनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेली पेरणी साधली. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलोऱ्यावर येत आहे. अशा महत्त्वाच्या काळात सोयाबीनवर अळीचा प्रदूर्भाव वाढू लागला आहे. ढगाळ वातावरण राहत असल्याने या अळीला पोषक वातावरण मिळत आहे.
ही उंट अळी हिरव्या रंगाची असून ती पानाचा हिरवा भाग फस्त करते. अळ्यांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या झाडावरील पानांची चाळणी झालेली दिसून येते. पानांची चाळणी झालेल्या झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी स्वअनुभवावर किटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र कृषी विभागाकडून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही.
दरवर्षी कृषी विभागामार्फत कोणती किटकनाशके फवारायची, याबाबत जनजागृती केली जायची. मात्र यावर्षी या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असतानाही कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तालुक्यातील गावागावात कृषी सहाय्यक भेटी देत असतात. मात्र त्यांनाही ही बाब लक्षात न येणे, हे न सजण्यासारखे कोडे आहे. काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधला, तर संपर्क होत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन व कोणते किटकनाशक फवारावे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.