कलावंतांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सभागृह हवे, विजय दर्डा यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:19 AM2018-01-23T03:19:16+5:302018-01-23T03:19:30+5:30
साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मांडली.
वणी (यवतमाळ) : साहित्यिक, कलावंतांचा खरा सन्मान करायचा असेल, तर सरकारने प्रत्येक जिल्हास्तरावर त्यांना सभागृह बांधून द्यावे, अशी सूचना लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे मांडली. त्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनीही सकारात्मक प्रतिसाद देत जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.
साहित्यिक व्यासपीठावर एकत्र आलेल्या दोन राजकीय धुरिणांनी रविवारी रसिकांच्या मनातली इच्छा पूर्ण केली. प्रसंग होता विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपाचा. माजी खासदार विजय दर्डा यांनी साहित्यिकांच्या मनातला मुद्दा मांडला. ते म्हणाले, देशाचे चारित्र्य हे लेखक, कलावंतांच्या सन्मानावर अवलंबून असते. ज्या देशात लेखक, कलावंतांचा सन्मान होतो, तो देश प्रगत ठरतो. परंतु, ग्रामीण भागातील कलावंतांना त्यांच्या आविष्कारासाठी व्यासपीठ मिळत नाही. मोठ्या शहरांमध्ये व्यासपीठे असली तरी ती महागडी आहेत. तेवढा पैसा खर्च करण्याची कलावंतांची ऐपत नसते. शासनाने ही बाब लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कलावंत, लेखकांना सभागृह उपलब्ध करून द्यावे. अशा सभागृहांचे दरही कमी ठेवावेत. तेव्हाच कलावंतांना आपली कला सहज सादर करता येईल, असे मत दर्डा यांनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले, यासंदर्भात मी स्वत: लक्ष घालीन. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहे. कलावंत व लेखक समाजाला दिशा देतात. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, यावर उभयतांनी आपल्या भाषणांमधून प्रकाश टाकला. कलावंतांच्या सभागृहासाठी हा सकारात्मक प्रतिसाद पाहून रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.