दारव्हातील मूलभूत सुविधा, सांडपाण्याची समस्या तातडीने मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:40 AM2021-08-29T04:40:01+5:302021-08-29T04:40:01+5:30
फोटो ग्राउंड रिपोर्ट भाग २ मुकेश इंगोले दारव्हा : जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या संकटात गेली. तरीसुद्धा कमी वेळात मोठ्या ...
फोटो
ग्राउंड रिपोर्ट भाग २
मुकेश इंगोले
दारव्हा : जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या संकटात गेली. तरीसुद्धा कमी वेळात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकासकामे करण्यात आली. मूलभूत सुविधा पुरविण्यासोबत शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्याचा दावा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.
दारव्हा शहरात अनेक विकासकामे झाली असली, तरी काही भागात पक्के रस्ते, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली बांधकाम करण्यात आले नाही. तसेच पाणीपुरवठा योजनेच्या विलंबाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. लवकरात लवकर ही कामे करण्याची मागणी होत आहे. सत्ता स्थापनेनंतर सर्वात आगोदर पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे आव्हान होते. यासाठी पाठपुरावा करून कामाला गती देण्यात आली. सध्या साडेतीन किलोमीटरचे पाइपलाइनचे काम होणे बाकी आहे. तसेच रेल्वे क्राॅसिंमुळे अडथळा निर्माण झाला होता, तोदेखील दूर होऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नातूवाडी, लढ्ढानगर, कृषी काॅलनी, शिवाजीनगर, अंबिकानगर, श्रीकृष्णनगर यासह जुन्या वसाहतीत रस्ते आणि नाली बांधकाम, दोन उर्दू शाळा, चार मराठी शाळा बांधण्यात आल्या. खुल्या जागांचा विकास होण्याच्या दृष्टीने सामाजिक सभागृह, योगा सेंटर, व्यायामशाळा बांधण्यात आल्या. काही भागात पथदिवे लावण्यात आले. मटण मार्केट, व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे टाऊन हाॅलसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले असून जागा निश्चित करण्यात आली. लवकर या बांधकामाला सुरुवात होणार आहे. याचबरोबर उर्वरित रस्ते, नाली, लेंडी नाला, भुयारी गटार यासह विविध कामे प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
शिक्षणात नावलौकिक
नगरपरिषदेच्या चार मराठी आणि तीन उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. शिक्षणाच्या बाबतीत या शाळांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे खासगीपेक्षा या शाळेत प्रवेशासाठी पालकांची पहिली पसंती असते. नगरपरिषदेने या शाळांना सुसज्ज इमारती, स्वच्छतागृह, डेक्स, बेंच, पिण्याचे पाणी यासह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
बॉक्स
घंटागाडीमुळे कचऱ्याची विल्हेवाट
शहरात घंटागाडी सुरू करण्यात आल्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी मदत झाली. घरातील ओला-सुका केरकचरा रस्ता, नालीत पडण्याऐवजी बाहेर नेला जात असल्याने घाण कमी झाली. त्यामुळे आरोग्य विभागावरील ताण कमी झाला. नाल्या सफाईचे नियोजन व्यवस्थित करता येणे शक्य झाले आहे.
बॉक्स
आमदार संजय राठोड यांचा पुढाकार
नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण, हद्दवाढ, सर्वसाधारण रस्ता निधी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वस्ती सुधार, सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान, नागरी दलितेतर वस्ती सुधार आदी योजनेंतर्गत निधी मिळाला. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेच्या २० कोटींसह वरील योजनेचा जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी आमदार संजय राठोड यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.
कोट
गेल्या चार वर्षांत सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली, शाळा, सामाजिक सभागृह यासह भरपूर विकासकामे करण्यात आली. पाणीपुरवठा योजनेचा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लागेल.
- बबनराव इरवे, नगराध्यक्ष, दारव्हा
बॉक्स
१ कोरोनामुळे संपूर्ण यंत्रणा गुंतली होती. आता कोरोना नियंत्रणात दिसत आहे. त्यामुळे कामांचे नियोजन करून संपूर्ण यंत्रणा कामी लावावी लागणार आहे. त्यामुळे विकासकामे तातडीने होण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
२ प्राप्त निधीच्या निकषानुसार कामे करावी लागतात. कामांची निवड करण्याचा सर्वस्वी अधिकार सर्वसाधारण सभेला आहे. त्यानुसार अंमलबजावणी करून कामांचे नियोजन केले जाते. आता अनेक अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.