महिलेला जखमी करून अस्वल गावात शिरले, राजुरवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 06:25 PM2021-05-21T18:25:00+5:302021-05-21T18:25:19+5:30
शेतात फणकट वेचत असलेल्या एका महिलेवर हल्ला करून अस्वल गावात शिरले. त्यामुळे गावकरी चांगलेच घाबरून गेेले. बराचवेळ हे अस्वल गावात लपून बसले.
पांढरकवडा (यवतमाळ) : शेतात फणकट वेचत असलेल्या एका महिलेवर हल्ला करून अस्वल गावात शिरले. त्यामुळे गावकरी चांगलेच घाबरून गेेले. बराचवेळ हे अस्वल गावात लपून बसले. काही तासानंतर अस्वल दिसताच, गावकऱ्यांनी तिला जंगलाकडे पिटाळून लावले. ही घटना शुक्रवारी सकाळी पांढरकवडा येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरवाडी येथे घडली.ललिता श्रावण देठे असे अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ती शुक्रवारी सकाळी ७ वाजता स्वत:च्या शेतात फणकट वेचण्याचे काम करित असताना तिच्यावर अचानक अस्वलीने हल्ला चढविला. यात ती जखमी झाली. ही बाब आजुबाजूच्या शेतातील नागरिकांच्या लक्षात येताच, आरडाओरड सुरू झाली.
त्यामुळे अस्वल जंगलाकडे जाण्याऐवजी राजुरवाडी गावात शिरले. गावातील दोन घरांच्या मधल्या बोळीत ती लपून बसली. ही माहिती घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी रंजित जाधव यांना कळताच, ते कर्मचाऱ्यांसह राजुरवाडीत दाखल झाले. त्यांनी पांढरकवडा उपवनसंरक्षकांना याबाबत माहिती दिली. लगेच त्यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. वनविभागाच्या पथकाने अस्वलीला चारही बाजुने घेरले. तिला सावली मिळावी, अशी व्यवस्था केली. अस्वलीला ट्रँक्यूलाईज करण्यासाठी पुसद येथील प्रशिक्षक चमुलादेखिल पाचारण करण्यात आले. मात्र या सर्वांना गुंगारा देऊन अस्वलीने सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जंगलाकडे धूम ठोकली.