नव्या राष्ट्रीय महामार्गात अमरावती-यवतमाळवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:16 AM2018-01-27T11:16:56+5:302018-01-27T11:20:58+5:30

मेळघाट-करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या वाटेवर असला तरी यात अमरावती-यवतमाळच्या प्रवासावर अन्याय होणार आहे. कारण एवढाच मार्ग दुपदरी असून उर्वरित सर्व मार्ग चौपदरी आहे.

Injustice to Amravati-Yavatmal on new national highway | नव्या राष्ट्रीय महामार्गात अमरावती-यवतमाळवर अन्याय

नव्या राष्ट्रीय महामार्गात अमरावती-यवतमाळवर अन्याय

googlenewsNext
ठळक मुद्देमार्ग केवळ दुपदरी मेळघाट ते करंजी मंजुरीच्या वाटेवरदोन हजार कोटींचे बजेट३१५ किलोमीटरची लांबी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मेळघाट-करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या वाटेवर असला तरी यात अमरावती-यवतमाळच्या प्रवासावर अन्याय होणार आहे. कारण एवढाच मार्ग दुपदरी असून उर्वरित सर्व मार्ग चौपदरी आहे. त्यामुळेच अमरावती-यवतमाळ हा मार्गसुद्धा चौपदरी करण्याची जोरदार मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होत आहे.
मेळघाटातील हा राष्ट्रीय महामार्ग मध्यप्रदेश सीमेपासून सुरू होणार आहे. परतवाडा-आसेगाव-अमरावती-नांदगाव खंडेश्वर-नेर-यवतमाळ-करंजी पर्यंत राहणार आहे. या रस्त्याच्या माध्यमातून अमरावती-यवतमाळ हे जिल्हे आणखी वेगानरीत्या जोडले जाणार आहेत. मध्यप्रदेशातील वाहनांना तेलंगणा-आंध्रप्रदेश तसेच मराठवाड्यात जाण्यासाठी हा मार्ग उपयोगी ठरणार आहे.
यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर ‘कनेक्टीव्हीटी’ निर्माण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गासाठी काम सुरू आहे. आता हा महामार्ग दिल्लीत मंजुरीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

कुठे चौपदरी, कुठे दुपदरी
३१५ किलोमीटर लांबी असलेल्या या महामार्गाचे बजेट सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे राहणार आहे. अमरावती ते परतवाडा आणि यवतमाळ ते करंजी (ता. पांढरकवडा जि. यवतमाळ) हा मार्ग चौपदरी तर अमरावती ते यवतमाळ हा दोन पदरी राहणार आहे.
या दोन पदरी रस्त्यासाठी प्रवासी वाहतूक कमी असणे हे कारण सांगितले जात आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या संपूर्ण मार्गावरच वाहतूक वाढणार एवढे निश्चित. मग अमरावती-यवतमाळ एवढाच रस्ता दुपदरी का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दुपदरी मार्गामुळेच चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचा उद्देश सफल होणार नाही, असे मानले जाते.
कारण या दुपदरी मार्गावर वाहनांची गती पुन्हा मंदावणार आहे. म्हणूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मेळघाटपासून करंजीपर्यंत सरसकट संपूर्ण महामार्गच चौपदरी करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

सहा ठिकाणी बायपास
धारणी, परतवाडा, आसेगाव पूर्णा, अमरावती, नेर, यवतमाळ येथे या महामार्गावर बायपास राहणार आहे. बायपास संपणाऱ्या प्रत्येक ठिकाणी छोटा पूल राहणार आहे.

नांदगाव खंडेश्वरला उड्डाण पूल
नांदगाव खंडेश्वर येथे उड्डाण पूल तर अमरावती-परतवाडा रोडवरील पेढी नदी येथे नवा पूल बांधला जाणार आहे. कारण तेथील पूल हा ११० वर्षे जुना आहे. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूने हा बायपास व पूल राहणार असल्याचे सांगितले जाते. नेरमध्ये अमरावतीवरून यवतमाळकडे येताना डाव्या बाजूने बायपास राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा नियोजित बायपास आहे. दिल्लीतून या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळताच भूसंपादन प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
दुपदरी मार्गाच्या या प्रकरणात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार व राजकीय नेत्यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Web Title: Injustice to Amravati-Yavatmal on new national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.