आणेवारीत आठ तालुक्यांवर अन्याय
By admin | Published: November 13, 2015 02:19 AM2015-11-13T02:19:02+5:302015-11-13T02:19:02+5:30
जिल्ह्याची सुधारित पीक आणेवारी जाहीर करताना आठ तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे.
यवतमाळ : जिल्ह्याची सुधारित पीक आणेवारी जाहीर करताना आठ तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, १६ पैकी केवळ आठच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे उर्वरित आठ तालुक्यांमध्ये शासनाप्रती रोष निर्माण झाला आहे. यापूर्वी नजर आणेवारीत जिल्ह्यातील केवळ दोनच गावातील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखविण्यात आली होती, तर २०५३ गावातील आणेवारी सरासरी ६३ टक्के दाखविल्याने या गावांना दुष्काळी लाभापासून वंचित राहावे लागले. जिल्ह्यात यावर्षी प्रचंड दुष्काळ असताना व शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या आणेवारीने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेसच्या आंदोलनानंतर शासनाला निर्णय बदलावा लागला. पण हा निर्णय घेताना वणी, मारेगाव,
आर्णी, पुसद, केळापूर, घाटंजी, राळेगाव व झरी या तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांच्यावर दाखविण्यात आली. हा या तालुक्यांवर अन्याय असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या आठही अन्यायग्रस्त तालुक्यात पुन्हा काळजीपूर्वक पीक पाहणी करून आणेवारी घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)