जातपंचायतीच्या बहिष्काराची चौकशी करा
By admin | Published: January 12, 2016 02:21 AM2016-01-12T02:21:36+5:302016-01-12T02:21:36+5:30
गवळी समाजाच्या जातपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे एक कुटुंब तब्बल २५ वर्षांपासून हालअपेष्टा भोगत आहे.
एसपींचे आदेश : काटखेडा येथील प्रकार
यवतमाळ : गवळी समाजाच्या जातपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे एक कुटुंब तब्बल २५ वर्षांपासून हालअपेष्टा भोगत आहे. पुसद तालुक्यातील काटखेडा येथील या गंभीर प्रकाराची तक्रार झाल्यानंतर आता पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
काटखेडा येथील हरिभाऊ बेगाजी साखरे यांच्या कुटुंबावर जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात साखरे यांनी जातपंचायतीचे सदस्य लक्ष्मण मंदाडे, बबन साखरे, बाबूराव साखरे, गजानन आवसरे, भास्कर साखरे, मधुकर ढोकणे, अनंता साखरे, संजय मंदाडे, संदीप मंदाडे, गणेश साखरे, रमेश साखरे यांच्या विरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.
हरिभाऊ साखरे यांनी आपली पहिली पत्नी लिलाबाई मंदाडे हिच्याशी ३ फेब्रुवारी १९६८ ला फारकत घेतली होती. त्यावेळी आपल्याला अपत्य नसल्याचे लिलाबाईने फारकतनाम्यात नमूद केले. मात्र फारकतीनंतर अनेक दिवसांनी झालेल्या अपत्याचा (देवीदास) पिता हरिभाऊच असल्याचा कांगावा करण्यात आला. लिलाबाईचे नातेवाईकच जातपंचायतीचे कर्ते-धर्ते असल्याने हरिभाऊवर या अपत्याला संपत्तीचा वाटा देण्याबाबत दबाव आणला गेला. या बाबीला विरोध केल्याने हरिभाऊ व त्याच्या कुटुंबीयांवर समाजाकडून बहिष्कार टाकण्यात आला. मारहाणीचे प्रकारही घडवून आणण्यात आले. याबाबत पाच दिवसात चौकशी अहवाल द्यावा, असा आदेश पोलीस अधीक्षकांनी पुसद ग्रामीण पोलिसांना दिला आहे. मात्र, १४ डिसेंबरच्या या आदेशावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही, असे तक्रारकर्त्यांनी सांगितले.
(स्थानिक प्रतिनिधी)