जिल्हा बँकेची विभागीय सहनिबंधकांकडून चौकशी

By admin | Published: April 11, 2017 12:02 AM2017-04-11T00:02:34+5:302017-04-11T00:02:34+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एका निनावी तक्रारीवरून अमरावती विभागीय सहनिबंधकांकडून (सहकारी संस्था) तीन सदस्यीय पथकाव्दारे चौकशी करण्यात आली.

Inquiries from the District Joint Registrar of District Bank | जिल्हा बँकेची विभागीय सहनिबंधकांकडून चौकशी

जिल्हा बँकेची विभागीय सहनिबंधकांकडून चौकशी

Next

निनावी तक्रार : संचालकावरच संशय, अहवालाची प्रतीक्षा
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एका निनावी तक्रारीवरून अमरावती विभागीय सहनिबंधकांकडून (सहकारी संस्था) तीन सदस्यीय पथकाव्दारे चौकशी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी विभागीय सहनिबंधकांच्या अमरावती कार्यालयात जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत तीन पानी निनावी तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीवर केवळ संचालक आणि स्वाक्षरी एवढाच शेवटी उल्लेख आहे. मात्र या तक्रारीची दखल घेऊन विभागीय सहनिबंधकांनी आपल्या अधिनस्त उपनिबंधक गायकवाड यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय चमू यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चौकशीसाठी पाठविली होती. या चमूने अनेक अभिलेख्यांची व व्यवहाराची दोन-तीन दिवस तपासणी केली. या चमूचा अहवाल सहनिबंधकांना अद्याप सादर झालेला नाही. त्यामुळे चौकशीत नेमके काय आढळले हे मात्र उघड होऊ शकले नाही. दरम्यान निनावी तक्रार करणारे ते संचालक कोण याचा शोध जिल्हा बँकेत सुरू झाला आहे. बैठकांमध्ये नेहमी आक्रमक राहणाऱ्या संचालकांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.
सीईओंचा निर्णय १७ ला
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सिंघम यांचा एक वर्ष प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना राज्य सहकारी बँकेच्या नागपूर विभागीय कार्यालयात परत पाठवायचे की मुदतवाढ द्यायची असा मुद्दा संचालक मंडळाच्या बैठकीत नुकताच उपस्थित केला गेला. तेव्हा काही संचालकांनी परत पाठवा तर काहींनी मुदतवाढ द्या, अशी भूमिका घेतली. यावर पर्याय म्हणून सीईओ सिंघम यांचा वर्षभरातील परफॉर्मन्स काय, त्यांचा बँकेला नेमका उपयोग किती झाला हे तपासण्याचे ठरले. यासंबंधीचा अहवाल १७ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या संचालक मंडळ बैठकीत ठेवला जाणार असून त्या दिवशी सिंघम यांना ठेवायचे की परत पाठवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

अखेर रवींद्र देशमुखांनी तक्रारीची जबाबदारी स्वीकारली

विभागीय सहनिबंधकांकडे केलेल्या निनावी तक्रारीची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक संचालक रवींद्र देशमुख यांनी स्वीकारली आहे. आपणच ही तक्रार केल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना मान्य केले. आपण ही तक्रार यापूर्वी नाबार्डकडे केली होती. तेथे दखल घेतली न गेल्याने सहनिबंधकांना पाठविली. या तक्रारीत बँकेतील अनेक गैरकारभारांचा उहापोह केला गेल्याचे व त्याबाबी चौकशीत आढळल्याचे देशमुख यांनी सांगितले. आपण आजारी असतानाच्या काळात बँकेत बराच घोळ झाला, असे सांगताना या प्रकाराबाबत कुणी संचालक बोलत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आम्ही गप्प राहिलो तर गैरकारभारात सहभागी आहोत, असा समज होतो. म्हणूनच आपण स्वत: ही तक्रार केली. त्यानंतरही कारभार न सुधारल्यास पुन्हा आपल्या स्पष्ट नावानिशी तक्रार करू, असा इशाराही रवींद्र देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.

निनावी पत्राची दखल घेऊ नये, असा शासनाचा नियम आहे. नाबार्डने हा नियम पाळला, परंतु विभागीय सहनिबंधकांनी याच निनावी तक्रारीच्या आधारे जिल्हा बँकेची चौकशी लावली. चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र अशा प्रकारामुळे बँकेच्या प्रतिमेला धक्का लागतो, शेतकऱ्यांमध्ये उगाच गैरसमज, संभ्रम निर्माण होतो. निबंधकांनी निनावी तक्रारीची दखल घेण्यामागील रहस्य उलगडलेले नाही.
- मनीष पाटील
अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ.

Web Title: Inquiries from the District Joint Registrar of District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.