वर्षभरातील सर्वच कामांची चौकशी; कंत्राटदारासह अधिकारीही धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2022 05:00 AM2022-05-01T05:00:00+5:302022-05-01T05:00:15+5:30

शनिवारी ‘लोकमत’ने कवठा-हिवरदरी जोड रस्त्याचे काम न करताच २६ लाखांचे बिल सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली.  कंत्राटदारांचे धाडस एवढे वाढले आहे की, कवठा ते हिवरदरी जोड रस्त्याची कोणतीही सुधारणा न करता मोजमाप पुस्तिका क्रमांक १४७६ तयार करून त्याचे बिल सादर करण्यात आले.  मात्र सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्याच्या सतर्कतेमुळे या कामाचे बिंग फुटले.

Inquiry of all works throughout the year; Officials, including the contractor, panicked | वर्षभरातील सर्वच कामांची चौकशी; कंत्राटदारासह अधिकारीही धास्तावले

वर्षभरातील सर्वच कामांची चौकशी; कंत्राटदारासह अधिकारीही धास्तावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील कवठा ते हिवरदरी रस्त्याच्या बनावट कामाचे मोजमाप पुस्तिका प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा परिषद  बांधकाम विभाग हादरून गेला आहे. या घटनेची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून वर्षभरातील एकूणच कामाची  समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
शनिवारी ‘लोकमत’ने कवठा-हिवरदरी जोड रस्त्याचे काम न करताच २६ लाखांचे बिल सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली.  कंत्राटदारांचे धाडस एवढे वाढले आहे की, कवठा ते हिवरदरी जोड रस्त्याची कोणतीही सुधारणा न करता मोजमाप पुस्तिका क्रमांक १४७६ तयार करून त्याचे बिल सादर करण्यात आले.  मात्र सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्याच्या सतर्कतेमुळे या कामाचे बिंग फुटले. विभागीय स्तरावरून उचल करण्यात आलेल्या मोजमाप पुस्तिका आणि झालेल्या कामाची मोजमाप पुस्तिका (एमबीए) रेकॉर्ड येथील बांधकाम उपविभागामध्ये नोंदच नाही. त्यामुळे विभागीय स्तरावरून आलेल्या मोजमाप पुस्तिका नेमक्या किती आणि कोणाला दिल्या, याचा ताळमेळ जुळत नाही. किती तरी मोजमाप पुस्तिका येथील बांधकाम उपविभागात नोंदल्या गेल्या नसल्याची बाबही आता पुढे येत आहे. 
यवतमाळ येथून उचल  करण्यात आलेल्या मोजमाप पुस्तिका संबंधित प्रभारी उपअभियंता एच.एम. कुमठे यांनी  उपविभागात नोंद न करता परस्पर जिल्हास्तरावर मंजूर करून घेतल्याची माहिती पुढे येत असून अशा काही प्रकरणाची कंत्राटदारांच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. 
परिणामी  कामाच्या बनावट मोजमाप पुस्तिकांची संख्या  बरीच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कवठा ते हिवरदरी रस्त्यामुळे उघडकीस आलेला प्रकार तालुक्यातील वर्षभरात झालेल्या इतरही कामांमध्ये असण्याची दाट शक्यता आहे.

आमदार म्हणाले, विधानसभेत आवाज उठविणार 
- येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागांतर्गत एकूणच विभागीय स्तरावरून मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांच्या मोजमाप पुस्तिकांची तपासणी आणि कामाच्या गुणवत्तेबाबत विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचे आमदार नामदेव ससाने यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्यासह कवठा ते हिवरदरी रस्त्याची पाहणी केली. 

कवठा ते हिवरदरी रस्त्याचे  कोणतेही देयक अदा करण्यात आले नाही. एकूणच कामाच्या चौकशीकरिता समिती नेमली जाईल.
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद

 

Web Title: Inquiry of all works throughout the year; Officials, including the contractor, panicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.