ढााणकी, ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:44 AM2021-05-07T04:44:07+5:302021-05-07T04:44:07+5:30
उमरखेड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी बुधवारी तालुक्यातील ...
उमरखेड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी बुधवारी तालुक्यातील ढाणकी व ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत सुविधांची पाहणी केली.
ढाणकी येथील केंद्राचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बाम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी केंद्रातील सोयी, सुविधांचा आढावा घेतला. समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरि पवार, गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कपाळे, साहाय्यक गटविकास अधिकारी अमोल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शामलताई कमठेवाड, पंचायत समिती सदस्या अनिता मार्लेवाड आदी उपस्थित होत्या.
ब्राम्हणगाव आरोग्य केंद्र सुरू होऊन १२ वर्षे लोटली. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी पदभरती अद्याप झाली नाही. स्वतंत्र औषधी पुरवठा दिला जात नाही. त्यामुळे रुग्णांना उपचाराविना परत जावे लागते. याबाबत सरपंच परमात्मा गरुडे यांनी माहिती दिली. तसेच पाणीस्त्रोत असलेल्या शासनाच्या जागेत विहीर मंजूर करून पूर्वीचे जलकुंभ कमी क्षमतेचे असल्याने वाढीव जलसाठ्याचे जलकुंभ मंजूर करावे, अशी मागणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे तसेच कोविड टेस्ट व लसीकरणालाही गती देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बॉक्स
ढाणकीवासियांचे कार्य प्रेरणादायी
कोरोनावर मात करण्यासाठी ढाणकी येथील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय लोकांनी एकत्रित येऊन लोकवर्गणी गोळा केली. त्यातून ३० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली. त्यात ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉंन्सट्रेटरचीही तयार केली. त्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे राम देवसरकर यांनी सांगितले. नागरिकांनी एकत्रित येऊन कठीण प्रसंगाशी दोन हात करण्यासाठी जो पुढाकार घेतला, तो इतर गावांना प्रेरणादायी ठरणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. यातून ढाणकीवासियांची एकीतून सामाजिक बांधिलकी दिसून आल्याचेही स्पष्ट केले.