सहा महिन्यांत आरटीओंकडून 142 खासगी प्रवासी वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 10:29 PM2022-10-12T22:29:04+5:302022-10-12T22:29:29+5:30
वायूवेग पथकात तरबेज असलेल्या एकाच वाहन निरीक्षकावर खर्च सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. पथकातील इतर अधिकाऱ्यांनी कारवाया केल्या, मात्र ट्रॅव्हल्स वगळून उर्वरित प्रवासी वाहनांवर कारवाई झाली. ट्रॅव्हल्स व्यवसायाचा पुरेपूर अनुभव याशिवाय ट्रॅव्हल्स पॉईंटवर पूर्णवेळ बैठक, त्यातून दैनंदिन वसुलीवर बारीक लक्ष ठेवले जात होते. महिन्याकाठीचा हिशेब नियमित जात असल्याने त्या जागेवर मागील नऊ महिन्यांत सहा वेळा एकाच निरीक्षकाला संधी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आरटीओतील एकूणच कारभाराची पद्धत उघड होत आहे. सहा महिन्यांत आरटीओंनी जिल्ह्यातील १४२ खासगी प्रवासी वाहनांची तपासणी केली. त्यात केवळ ३३ वाहने दोषी दाखविण्यात आली तर सहा वाहने ताब्यात घेतली. १६ वाहनांच्या केसेसचा निपटारा केला. त्यात तीन लाख ३० हजार रुपये दंड वसूल झाला व एका वाहनाचा टॅक्स थकीत असल्याने तो एक लाख २० हजार वसूल केला. या प्रवासी वाहनांची कारवाई करतानाही वायूवेग पथकाने आखडता हात घेतल्याचे दिसून येते.
वायूवेग पथकात तरबेज असलेल्या एकाच वाहन निरीक्षकावर खर्च सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. पथकातील इतर अधिकाऱ्यांनी कारवाया केल्या, मात्र ट्रॅव्हल्स वगळून उर्वरित प्रवासी वाहनांवर कारवाई झाली.
ट्रॅव्हल्स व्यवसायाचा पुरेपूर अनुभव याशिवाय ट्रॅव्हल्स पॉईंटवर पूर्णवेळ बैठक, त्यातून दैनंदिन वसुलीवर बारीक लक्ष ठेवले जात होते. महिन्याकाठीचा हिशेब नियमित जात असल्याने त्या जागेवर मागील नऊ महिन्यांत सहा वेळा एकाच निरीक्षकाला संधी देण्यात आली आहे. मुळात ड्युटी लावताना रोटेशन पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे. जेणेकरून कुणीही एका ठिकाणी गुंतून हितसंबंध निर्माण होऊ नये हा या मागचा उद्देश आहे. याकडे गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्ष होत असल्याचे आरटीओ वर्तुळातूनच ऐकायला मिळत आहे. अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करताना ट्रॅव्हल्सला सोयीस्करपणे वगळण्यात आले. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात चालणाऱ्या १४२ प्रवासी वाहनांची तपासणी केली. जिल्हाभरातील व्यावासयिक प्रवासी वाहनांची संख्या पाहता ही कारवाई केवळ सोपस्कार असल्याचे स्पष्ट होते.
नागालॅन्ड, अरुणाचल पासिंगच्या ट्रॅव्हल्स जिल्ह्यात
- धक्कादायक प्रकार आता उघडकीस येवू लागला आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नागालॅन्ड, अरुणाचल, पॉन्डेचरी येथील आरटीओ पासिंग असलेल्या ट्रॅव्हल्स लोकल प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहे. वायूवेग पथक-१ ने कारवाई केल्यानंतर हा प्रकार चार दिवसापूर्वी उघड झाला. अशा सहा ट्रॅव्हल्स जप्त केल्या आहेत. त्यातील दोन यवतमाळात व पुसदमध्ये चार ट्रॅव्हल्स आहेत.
खासगी बसमधून प्रवाशांसोबत मालाची वाहतूक
- खासगी बसेसमधून महानगरांकडे प्रवाशांसोबतच मालाची वाहतूक केली जाते. या बसेसमध्ये दुचाकी, कापडाचे गठ्ठे यासह इतर अनेक वस्तू लादल्या जातात. याकरिता बसमध्ये स्वतंत्र कप्पेच बनविण्यात आले आहे. ही बस प्रवाशांसाठी की माल वाहतुकीसाठी असा प्रश्नही उपस्थित होतो. याचा धोका असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- ट्रॅव्हल्स व्यवसायात भागीदार असलेल्याला जबाबदारी दिल्याने कुठल्याच ट्रॅव्हल्सची तपासणी किंवा ठोस कारवाई झाली नाही. बिनबोभाटपणे ट्रॅव्हल्समधून प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेले जातात. याकडे हितसंबंधातूनच दुर्लक्ष होत असल्याचे आता उघड झाले आहे. वायूवेग पथकाच्या कारवाईने राज्याबाहेरील पासिंगच्या बसेसही हाती लागल्या आहेत.