अमरावतीच्या दिव्यांग शिक्षकांची यवतमाळात तपासणी, बदल्यांमध्ये घेतला लाभ

By अविनाश साबापुरे | Published: May 4, 2023 06:02 PM2023-05-04T18:02:00+5:302023-05-04T18:02:11+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होऊन एक महिना लोटला आहे. आता हे शिक्षक कार्यमुक्ती आदेश मिळविण्यासाठी धडपडत आहे.

Inspection of disabled teachers of Amravati in Yavatmal, | अमरावतीच्या दिव्यांग शिक्षकांची यवतमाळात तपासणी, बदल्यांमध्ये घेतला लाभ

अमरावतीच्या दिव्यांग शिक्षकांची यवतमाळात तपासणी, बदल्यांमध्ये घेतला लाभ

googlenewsNext

यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होऊन एक महिना लोटला आहे. आता हे शिक्षक कार्यमुक्ती आदेश मिळविण्यासाठी धडपडत आहे. मात्र त्यात अनेकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संबंधित दिव्यांग शिक्षकांची यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडून तपासणी केली जाणार आहे. 
बदली प्रक्रियेमध्ये सूट मिळविण्यासाठी किंवा प्राधान्याने पसंतीचे गाव मिळविण्यासाठी अनेक शिक्षकांनी संवर्ग-१ मधून अर्ज भरला. त्यात प्रामुख्याने दिव्यांग शिक्षकांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे तसेच विभागीय आयुक्तांकडेही दाखल झाल्या आहे.

आता ग्रामविकास विभागाने बदली झालेल्या शिक्षकांना १५ मेपूर्वी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र तत्पूर्वी शिक्षकांनी अपंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे तर सादर केली नाही ना, याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी यवतमाळ येथील मेडिकलमधून शिक्षकांना तपासणी करवून घेण्याचे निर्देश दिले आहे. त्यासंदर्भात त्यांनी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांनाही तपासणी करून देण्याबाबत पत्र पाठविले आहे. शिक्षक बदली प्रक्रियेत वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या जोडीदारांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत संबंधिताचे प्रमाणपत्र किंवा त्याचे अपंगत्व खोटे आढळल्यास बदली प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे. 

यवतमाळच्या शिक्षकांचे काय?

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातही संवर्ग-१ मधून जवळपास एक हजार शिक्षकांनी बदलीचे अर्ज भरले आहे. त्यांच्या बदल्याही झाल्या आहे. येथेही काही शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी आहेत. अमरावतीप्रमाणे यवतमाळच्या शिक्षकांचीही तपासणी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

आंतरजिल्हा बदलीत फार कमी दिव्यांग शिक्षक आहेत. जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये दिव्यांग शिक्षक आहेत. सर्वांच्याच कागदपत्रांची तपासणी केली जाते. परंतु, बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने आपल्या स्तरावर फार काही नसते. दिव्यांग शिक्षकांच्या आकडेवारीची माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
- डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, सीईओ, यवतमाळ

आपल्याकडे आंतरजिल्हा बदली झालेल्या उर्वरित १२७ शिक्षकांना लवकरच कार्यमुक्त केले जाईल. त्यातील काहींनी नकार दिला आहे. मात्र तो नकार मान्य करावा की करू नये याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार सीईओंना आहे. अमरावतीप्रमाणे आपल्याकडे जिल्हांतर्गत बदलीमधील दिव्यांग शिक्षकांची तपासणी करण्याबाबत अद्याप तरी वरिष्ठांचे निर्देश नाही. 
- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ

Web Title: Inspection of disabled teachers of Amravati in Yavatmal,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.