पोलीस महानिरीक्षक पुसदमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:11 PM2019-07-18T22:11:46+5:302019-07-18T22:12:12+5:30
येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
गेल्या रविवारी रात्री संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रवीण दादाराव कदम यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला झाला होता. त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहण करण्यात आली होती. यात प्रवीण कदम गंभीर जखमी झाले. यानंतर त्याच दिवशी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ५०० ते ६०० जणांच्या जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लबोल केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी पुसदला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. नंतर वसंतनगर पोलीस ठाण्याला भेट दिली.
रानडे यांनी वसंतनगर, पुसद शहर, पुसद ग्रामीण व खंडाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी घटनेचा परिपूर्ण आढावा घेतला. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना त्वरीत अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. रानडे यांनी गेल्या चार वर्षांच्या गुन्ह्याचा पोलीस ठाणे निहाय आढावा घेतला. तसेच येत्या काळातील सण, उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी कोणती भूमिका घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वसंतनगरचे ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी, शहरचे ठाणेदार रमेश आत्राम, ग्रामीणचे ठाणेदार संजय चौबे, खंडाळाचे ठाणेदार बी.एस. ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, एलसीबीचे नीलेश शेळके यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.