पोलीस महानिरीक्षकांचा जिल्ह्यात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:08 PM2018-12-08T21:08:13+5:302018-12-08T21:08:46+5:30

वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे १३ डिसेंबरनंतर दोन दिवस जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे. या काळात ते तीन पोलीस ठाणे, तीन एसडीपीओ कार्यालये व अन्य शाखांना भेटी देणार आहे.

Inspector General of Police stay in the district | पोलीस महानिरीक्षकांचा जिल्ह्यात मुक्काम

पोलीस महानिरीक्षकांचा जिल्ह्यात मुक्काम

Next
ठळक मुद्देवार्षिक निरीक्षण : तीन पोलीस ठाणे, एसडीपीओ कार्यालये, विविध शाखांची ‘कामगिरी’ तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे १३ डिसेंबरनंतर दोन दिवस जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे. या काळात ते तीन पोलीस ठाणे, तीन एसडीपीओ कार्यालये व अन्य शाखांना भेटी देणार आहे.
जिल्हा पोलीस दलाअंतर्गत काही ठाण्यांचे वार्षिक निरीक्षण आटोपले. आता पोलीस दलाला महानिरीक्षकांच्या निरीक्षणाचे वेध लागले आहे. त्या दृष्टीने साफसफाईची जोरदार मोहीम राबविली जात आहे. नियोजित कार्यक्रमाशिवाय महानिरीक्षक अचानक एखादे पोलीस ठाणे अथवा शाखेला भेट देण्याची शक्यता पाहता सर्वच जण अलर्ट आहेत. मुंबईतील आयपीएस अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेमुळे हे निरीक्षण दोन दिवस लांबणीवर पडले आहे. महानिरीक्षक कार्यालयाची चमू निरीक्षणासाठी आधीच जिल्ह्यात दाखल झाली आहे. स्वत: महानिरीक्षक १३ डिसेंबरपासून जिल्ह्यात येणार आहे. दारव्हा पोलीस ठाणे, पुसदचे एसडीपीओ कार्यालये, उमरखेड पोलीस ठाणे, यवतमाळ शहर पोलीस ठाणे, पांढरकवडा व वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांचे निरीक्षण केले जाणार आहे. आस्थापना शाखा, पत्रव्यवहार शाखा, लेखा शाखा, पोलीस मुख्यालय, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा, मोटर वाहन विभाग, रुग्णालय, बीडीडीएस, कल्याण शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा यांचाही टिपणी वाचनाद्वारे धावता आढावा घेतला जाणार आहे. या निरीक्षण काळात ‘आलबेल’ दाखविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेकडून होण्याची शक्यता आहे. महानिरीक्षक तरवडे हे परंपरागत निरीक्षण सोडून जिल्ह्यात अकस्मात वेगळे काही निरीक्षण करतात का याकडे लक्ष लागले आहे. अशा निरीक्षणासाठी इच्छाशक्ती लागते एवढे निश्चित.
गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी थंडबस्त्यात
ग्रामीण महाराष्ट्रातील मटका, जुगार, अवैध दारू व तमाम अवैध धंदे बंद करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी दिले होते. हे धंदे बंद आहेत की नाही हे तपासण्याची जबाबदारी पोलीस महानिरीक्षकांवर सोपविण्यात आली होती. या आदेशानंतर काही दिवस धंदे चोरुन-लपून चालले. मात्र अवघ्या काही दिवसातच पुन्हा जैसे थे सुरू झाले. अलिकडे तर हे धंदे आणखी वाढल्याचे चित्र आहे. पोलीस कार्यालये, लोकप्रतिनिधींच्या घरांपासून हाकेच्या अंतरावर हे धंदे सुरूआहे. त्यानंतरही पोलिसांची बघ्याची भूमिका आहे. ते पाहता ‘लाभ’दायक अवैध धंद्यांपुढे पोलीस यंत्रणा गृहराज्यमंत्र्यांनाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे पाहता अमरावतीच्या पोलीस महानिरीक्षकांचे पथकही कुचकामी ठरल्याचे दिसते. स्थानिक पोलिसांच्या ‘सपोर्टिंग’ भूमिकेला अमरावतीतूनही पाठबळ नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आता तर या अवैध धंद्यांबाबत गृहराज्यमंत्र्यांकडूनही बंद झाले का म्हणून पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही जनतेतून साशंकतेने पाहिले जात आहे. आता महानिरीक्षकांच्या भेटी दरम्यान त्यांच्या निरीक्षण मार्गावरील धंदे बंद ठेवण्याची सावधगिरी स्थानिक पोलीस यंत्रणेकडून बाळगली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिसाचा खुनी अद्याप फरारच
मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खून प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम (हिवरी) हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याच कारणावरून महासंचालकांनी स्थानिक पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जाते. आठवडाभर २०० ते २५० पोलिसांची फौज तैनात करूनही मारेकरी न सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. त्यातच मृतकाच्या घरी सांत्वना भेट देण्यासाठी प्रशासनाने विलंब लावला, त्यांच्या उच्च पदस्थांना तर त्याचीही गरज न वाटल्याने मृताचे नातेवाईक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Inspector General of Police stay in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस