३६ लाख हेक्टरवरील पिकांचे विमा कवच रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 03:18 PM2019-07-25T15:18:33+5:302019-07-25T15:22:11+5:30
पीक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी पंतप्रधान विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ३६ लाख हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या आहेत.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पीक नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी पंतप्रधान विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने ३६ लाख हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या आहेत. तर दुसरीकडे पीक विमा काढण्याची वाढीव अंतिम मुदत केवळ चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांनाच हा विमा काढता येतो. त्यामुळे यंदा ३६ लाख हेक्टरवरील पीक विम्याच्या संरक्षणाबाहेर राहणार आहे.
आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. हा दावा किती पोकळ आहे, याचा प्रत्यय पीक विमा उतरविताना येत आहे. नैसर्गिक संकटामुळे संपूर्ण राज्य होरपळत आहे. पाऊस नसल्याने राज्यातील २४ टक्के पेरण्या अजूनही शेतकऱ्यांना करता आल्या नाही. यामुळे हे शेतकरी मोठ्या आशेने पंतप्रधान पीक विमा योजनेकडे पाहत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी पिकांची पेरणी होणे बंधनकारक आहे.आता निसर्गच रूसला, तर पेरणी करायची कशी असा प्रश्न पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची गरज असताना मुदत संपत असल्याने त्यांना मदतीला मुकावे लागणार आहे.
राज्यातील २४ जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत पेरणीपूर्वीच संपत आहे. यामुळे ३६ लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागच नोंदविता येणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होणे आणि मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. राज्यातील एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी एक कोटी १५ लाख हेक्टरवरच्या पेरण्या आटोपल्या आहेत. तर ३६ लाख हेक्टरवरच्या पेरण्या अजूनही थांबलेल्या आहेत.
विमा कंपन्यांची चलाखी
निसर्ग कोपल्याने ज्या भागात पेरण्या झाल्या नाही, अशा ठिकाणी उंबरठा उत्पन्न शून्य येणार आहे. कारण पीक करपल्याने या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नाही. यामुळे उत्पन्न निरंक राहण्याचा धोका आहे. हे उत्पन्न सरासरी उत्पन्नाच्या कमी असणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे कंपन्यानी तत्पूर्वीच विम्याची मुदत गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे.