‘मेडिकल’मधील विमा दुकानदारीचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:43 PM2017-07-26T19:43:20+5:302017-07-26T20:49:26+5:30
राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुकानदारी थाटून
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुकानदारी थाटून रुग्णांची लुबाडून करण्याचा प्रकार ‘लोकमत’मुळे उघडकीस आला. गत १८ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत अधिष्ठातांसह रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ असल्याचे पुढे आले.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर कक्ष थाटून काही तरुणांनी राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेची नोंदणी सुरू केली होती. गत १८ दिवसांपासून या रुग्णालयात येणाºया गोरगरीब जनतेकडून शंभर रुपये वसूल केले जात होते. ही योजना एपीएल आणि बीपीएल कुटुंबासाठी असून वार्षिक विमा योजना असल्याचे तेथील तरुण सांगत होते. यासाठी एक अर्ज भरुनघेऊन शंभर रुपये घेण्यात येत होते. विशेष म्हणजे अर्जावर कोणताही क्रमांक नव्हता. तसेच कुटुंबाची केवळ जुजबी माहिती घेतली जात होती. कुटुंब प्रमुखाचे आधार, रेशन कार्ड, वीज बिल आणि दोन फोटो मागविले जात होते. हा अर्ज भरल्याची रितसर पावतीही दिली जात नव्हती. गत १८ दिवसांपासून शेकडो रुग्णांकडून शंभर रुपयाप्रमाणे वसुली करण्यात आली.
हा प्रकार प्रस्तूत प्रतिनिधीच्या लक्षात आला. त्याबाबत चौकशी केली तेव्हा नोंदणी करणाºया युवकांची बोबडीच वळली. अधिष्ठातांच्या आदेशाने हा प्रकार सुरू असल्याचे सांगत लोहारा येथील आशिष गोल्हर नामक तरुण तालुका समन्वयक असल्याचे सांगितले. आशिष गोल्हरशी मोबाईलवरून संपर्क केला असता त्याने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या निर्देशावरून ही योजना राबवित असल्याचे ठामपणे सांगितले. मात्र त्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने अधिष्ठाता आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे याप्रकाराबाबत माहिती विचारली. त्यावरून शासनाकडून असा कोणताच कार्यक्रम राबविला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी तर थेट या युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता कोणतेच अधिकृत दस्तावेज आढळून आले नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांनी तालुका समन्वयकाला मोबाईलवर संपर्क केला. त्याला डीएचओ कार्यालयात येण्यास सांगितले. मात्र त्याने आपला फोन स्वीच आॅफ करून प्रतिसाद देणे टाळल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासारख्या ठिकाणी कुणीही येतात, दुकानदारी थाटतात, गोरगरिबांची लूट करतात मात्र याची खबरबात १८ दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाला नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारामागे ‘मेडिकल’मधील कोणता अदृश हात आहे, याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आता पोलिसात तक्रार झाल्यानंतर वास्तव बाहेर येणार आहे.
शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सुरू असलेला विमा कार्ड योजनेचा प्रकार पूर्णत: नियमबाह्य आहे. त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. शिवाय अशी कुठलीही योजना नसल्याने या प्रकरणाची तक्रार पोलिसात देत आहो.
- डॉ. अशोक राठोड
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.