सोयाबीनवर आलेल्या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:38+5:302021-07-24T04:24:38+5:30
पांढरकवडा : तालुक्यातील शेतशिवारातील सोयाबीन या पिकावर खोडमाशी व चक्रीभुंगा किडीने आक्रमण केले असून, तातडीने या पिकाचे एकात्मिक ...
पांढरकवडा : तालुक्यातील शेतशिवारातील सोयाबीन या पिकावर खोडमाशी व चक्रीभुंगा किडीने आक्रमण केले असून, तातडीने या पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड व तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी केले आहे.
खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोड माशीची अळी व कोष फांद्यात, खोडात असते. अशा कीडग्रस्त झाडांवरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्यांचे वजन कमी होऊन उत्पादन १६ ते ३० टक्के घटते. चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणतः एकमेकांपासून १ते १.५ सेंमी अंतरावर एकमेकांस समांतर दोन गोल चक्र काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ आणि फांदीतून आत जाते व मुख्य खोडाचा भाग पोखरते. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पीक साधारणतः दीड महिन्याचे झाल्यावर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही; परंतु कीडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात. परिणामी, उत्पादनात घट येते. यासाठी एकरी २५ चिकट सापळे लावून नियमित माशांचा प्रादुर्भाव पाहणे आवश्यक आहे. खोडमाशी व चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वेचून आतील किडीसह नष्ट करावे, खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी इथियान ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के ६.७ मिली किंवा क्लोरांट्रानिप्रोल १८.५ टक्के मिली किंवा थायोमथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी २.५ मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड व तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी केली आहे.