श्रीमंतांना फसविणारी आंतरराज्यीय टोळी ; यवतमाळात ‘सीए’ला ३५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:37 PM2020-02-28T14:37:43+5:302020-02-28T14:38:03+5:30
प्रतिष्ठित व श्रीमंतांची आधी माहिती काढायची, नंतर अॅप्रोच होऊन त्यांना गुंतवणुकीसाठी तयार करायचे व या माध्यमातून त्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करायची. हा फंडा असलेली आंतरराज्यीय टोळी यवतमाळात सक्रिय आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रतिष्ठित व श्रीमंतांची आधी माहिती काढायची, नंतर अॅप्रोच होऊन त्यांना गुंतवणुकीसाठी तयार करायचे व या माध्यमातून त्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करायची. हा फंडा असलेली आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे. यवतमाळात एका ‘सीए’ला ३५ लाख रुपयांनी फसविल्याच्या प्रकरणात या टोळीचा मास्टर माईन्ड स्थानिक पोलिसांच्या रेकॉर्डवर आला असला तरी त्याच्या साथीदारांवर मात्र पोलिसांनी अजूनही फोकस निर्माण केलेला नाही.
गोपालकृष्ण उर्फ संजय सबने (५०) असे या मास्टर माईन्डचे नाव आहे. तो अशी अनेक नावे व वेगवेगळे पत्ते धारण करतो. त्याने यवतमाळातील ‘सीए’ हरिश गणपतराव चव्हाण (रा. दारव्हा रोड यवतमाळ) यांना पोकलॅन्ड, जेसीबी खरेदी करून देण्याच्या नावाखाली ३५ लाखांनी फसविले आहे. विशेष असे या ‘सीए’ला आधी गोपालकृष्णने व त्यानंतर तपास करणाऱ्या पोलिसांनीही फसविले. त्याविरोधात ‘सीए’ने २७ जानेवारी २०२० रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. मात्र ठोस काही न झाल्याने अखेर हा सीए न्यायासाठी ‘लोकमत’च्या दरबारात पोहोचला. त्याने डिसेंबर २०१७ पासून सुरू झालेल्या फसवणुकीच्या या प्रवासाची आपबिती कथन केली. गोपालकृष्णने अशाच पद्धतीने राज्यात आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात अनेकांंना कोट्यवधींनी गंडा घातला आहे.
पत्ता बंगळूरचा, निघाला बेळगावचा
गोपालकृष्णने ‘सीए’ हरीश यांना त्याने आपला पत्ता बंगळूरचा सांगितला. प्रत्यक्षात तो कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील बेळगावचा रहिवासी निघाला. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात २ जून २०१९ ला अटक केली होती. चव्हाण यांच्या मुंबईतील सीए कार्यालयात तो अॅप्रोच झाला होता. त्याने पोलिसांपुढे आपले एकूणच कारनामे उघड केले. त्याच्या या टोळीचे हैदराबाद, केरळ, मुंबई, गुजरात, कर्नाटक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कराड, सातारा व अन्य काही भागात नेटवर्क आहे. त्या माध्यमातून श्रीमंतांची आधी माहिती काढली जाते, त्यांच्याशी काही कामाच्या निमित्ताने सलगी वाढविली जाते, या श्रीमंताला नेमकी कशाची गरज आहे हे ओळखून नंतर त्यावर जाळे फेकले जाते. मोठ्या हॉटेलांमध्ये त्यासाठी बैठका, भेटीगाठी घेतल्या जातात.
सीसीटीव्हीसमोर येताच तोंडावर रुमाल
हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नेमके कुण्याबाजूने लागले आहेत, याची माहिती आधीच काढली जाते. त्यानुसार कॅमेरात चेहरा येणार नाही याची खबरदारी घेतली जाते, त्यासाठी नेमके कॅमेरासमोरुन जाताना तोंडावर रुमाल झाकला जातो. फसवणुकीच्या या धंद्यात वेगवेगळे मोबाईल नंबर वापरले जातात. आवश्यकतेनुसार सीमकार्ड बदलविले जातात.
ऑटोरिक्षा चालकामार्फत सीमकार्ड खरेदी
बेळगावातील एका ऑटोरिक्षा चालकामार्फत वेगवेगळ्या नावाने या सीमकार्डची खरेदी केली जाते. माहिती काढून देण्यापासून ते ठिकठिकाणी संरक्षण पुरविण्यापर्यंत आपली यंत्रणा असल्याचे आरोपी पोलिसांना सांगतो. वेळप्रसंगी पोलिसांनाही आपल्या पद्धतीने वाकविले जाते. त्यामुळेच आजतागायत हा मास्टर माईन्ड किंवा त्याच्या टोळीचे सदस्य पोलिसांच्या रेकॉर्डवर येऊ शकलेले नव्हते. पैसे डबल करून देणे, रियल इस्टेटमधील व्यवहार, अशा वेगवेगळ्या व्यवहारात ही टोळी सक्रिय आहे.
भरपाईसाठी निवडला फसवणुकीचा मार्ग
आरोपी गोपालकृष्णने पोलिसांना सांगितले की, त्याला एका व्यापारात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ते भरुन काढण्यासाठी त्याने फसवणुकीचा हा गोरख धंदा हाती घेतला. त्यात साथ देण्यासाठी माणसांचे मोठे नेटवर्क राज्यात व बाहेरही तयार केले.
६० टक्के वाटप, ४० टक्के लाभ
फसवणुकीच्या या व्यवसायात ६० टक्के वाटप व ४० टक्के स्वत:चा लाभ असा हिशेब आरोपीने पोलिसांना सांगितला. प्राथमिक माहिती काढून देणाºयाला २० टक्के रक्कम दिली जाते, सीमकार्ड देणारे, पाहिजे तिथे संरक्षण पुरविणारे व इतर घटकांना उर्वरित रक्कम वितरित केली जाते.