मुख्यमंत्र्यांचा घरकुल लाभार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:07 PM2019-01-02T22:07:36+5:302019-01-02T22:09:05+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घरकूल योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय जमीन खरेदी योजनेच्या लाभार्थ्यांशी मंत्रालयातून संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घरकूल योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय जमीन खरेदी योजनेच्या लाभार्थ्यांशी मंत्रालयातून संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात २१ लाभार्थी उपस्थित होते. यात यवतमाळ, बाभूळगाव, नेर, उमरखेड आणि दिग्रस येथील घरकूल लाभार्थ्यांचा समावेश होता.
लाभार्थ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. राज्यात २०१९ अखेरपर्यंत सर्वांना घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात १२ लाख घरकूल देण्याचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत सहा लाख घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरीत घरकूल वर्षभरात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाच ब्रासपर्यंत मोफत रेती
मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत वाळू रॉयल्टीविना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. घराचा नकाशा तयार करण्यासाठी लागणारी रक्कम कमी करण्याचा शासनाकडून प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.