कॅन्सरग्रस्तांचा यवतमाळकरांशी जाहीर सुसंवाद

By admin | Published: June 14, 2014 11:53 PM2014-06-14T23:53:11+5:302014-06-14T23:53:11+5:30

कॅन्सरसारख्या असाध्य रोगासोबत लढत असतानाच इतरांनाही जगण्याचे बळ द्यावे म्हणून प्रयास-सेवांकूरच्यावतीने यवतमाळात कॅन्सरग्रस्तांच्या संघर्ष गाथा उलगडून लावणाऱ्या एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन

Interaction with Yavatmalak | कॅन्सरग्रस्तांचा यवतमाळकरांशी जाहीर सुसंवाद

कॅन्सरग्रस्तांचा यवतमाळकरांशी जाहीर सुसंवाद

Next

जगण्याची लढाई : प्रयास-सेवांकूरचे आयोजन
यवतमाळ : कॅन्सरसारख्या असाध्य रोगासोबत लढत असतानाच इतरांनाही जगण्याचे बळ द्यावे म्हणून प्रयास-सेवांकूरच्यावतीने यवतमाळात कॅन्सरग्रस्तांच्या संघर्ष गाथा उलगडून लावणाऱ्या एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील महेश भवनामध्ये रविवारी १५ जूनला सायंकाळी ६.३० वाजता या प्रेरणादायी कार्यक्रमाचे नि:शुल्क आयोजन करम्यात आले आहे.
कॅन्सर हा शब्द ऐकला की, माणसाचा धीर सुटून जातो. जगण्याची उमेद नुसत्या कल्पनेनेच हरवून बसते. मात्र कॅन्सरचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होऊ न देता अत्यंत सकारात्मक पद्धतीने जीवन जगणाऱ्या नागपूर येथील डॉ.निर्मला वझे, अमरावती येथील छाया भट्ट, यवतमाळ येथील जीवतराम कटियार, यवतमाळातीलच शीला कांबळे व डॉ.सुरेश मुडे यांची कहाणी जनतेसमोर उलगडल्या जाणार आहे.
मागील तीन महिन्यांपासून प्रयास-सेवांकूरच्यावतीने सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचे ठसे उमटविणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख शहरवासीयांना कार्यक्रमाच्या माध्यमातून करून देण्यात येत आहे. कॅन्सरग्रस्तांच्या संघर्ष गाथेचा हा अनोखा कार्यक्रम अनेकांना जगण्याची नवी उभारी देणारा आहे. निर्मला वझे यांना वयाच्या ४० व्या वर्षी स्तनाचा कॅन्सर झाला. त्यानंतर पुन्हा एकदा रिकरन्स झाला. आर्कीटेक्ट असलेल्या स्वत:च्या मुलीलाही लग्नानंतर महिनाभरातच कॅन्सरचे निदान झाले. उपचारानंतर मुलीचा कॅन्सरही बरा झाला. या सर्व दिव्यातून गेल्यावरही ६८ व्या वर्षीसुद्धा स्त्रीरोग तज्ञ असलेल्या डॉ.निर्मला वझे स्वस्थ आयुष्य जगत आहेत. संंपूर्ण देशभरात त्या कॅन्सरवर जनजागृती करीत असून अनेकांना आधार दिला आहे.
१९९२ मध्ये मध्यप्रदेश सरकारचा सर्वोच्च खेळ सन्मान प्राप्त केलेल्या अमरावती येथील छाया भट्ट यांना आतड्याचा कॅन्सर झाला. तीन आॅपरेशन्स व आठ केमोथेरपी झाल्यानंतर पुन्हा खेळण्याचा सराव सुरू केला. फेब्रुवारी २०१४ मध्ये जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेमध्ये त्यांनी दोन सुवर्ण व दोन रजत पदके प्राप्त केली. १९८४ ते २०१० दरम्यान राष्ट्रीय स्पर्धांमध्ये २६ वेळा पहिल्या तीनमध्ये स्थान पटकाविले. अ‍ॅथलेटिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके प्राप्त केली. चिन, तैवान, फिलीपाईन्स, स्विडन, कझाकिस्तान येथे पार पडलेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
यवतमाळातील जीवतराम कटियारा चाळीशीत कॅन्सर झाल्यानंतर आज वयाच्या ७० व्या वर्षी कॅन्सरमुक्त जीवन जगत आहे. डॉ.सुरेश मुडे यांना वयाच्या ४५ व्या वर्षी पोटाच्या लिंकोमा कॅन्सरने ग्रासले. आज वयाच्या ६१ व्या वर्षी ते कॅन्सरमुक्त जीवन जगत असून वैद्यकीय व्यवसायासह विविध सामाजिक प्रश्नांवर लेखन करीत आहे. शिलाताई कांबळे यांनीसुुद्धा स्तनाच्या कर्करोगाशी संंघर्ष करीत आपले सामाजिक योगदान कायम ठेवले आहे. अशा या कॅन्सरग्रस्तांची संघर्षगाथा यवतमाळकरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Interaction with Yavatmalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.