ग्रीसमध्ये आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल; ३६ देशातील विद्यार्थ्यांना भावला ढोलकीचा ताल, घुंगराचा बोल

By विशाल सोनटक्के | Published: October 26, 2022 10:49 AM2022-10-26T10:49:22+5:302022-10-26T10:52:10+5:30

नेरच्या प्राध्यापकाने दिले गण, गौळण, बतावणीचे धडे

International Festival in Greece; the students of 36 countries felt the rhythm of the dholak and the voice of ghungroo | ग्रीसमध्ये आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल; ३६ देशातील विद्यार्थ्यांना भावला ढोलकीचा ताल, घुंगराचा बोल

ग्रीसमध्ये आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल; ३६ देशातील विद्यार्थ्यांना भावला ढोलकीचा ताल, घुंगराचा बोल

googlenewsNext

यवतमाळ : ग्रीसमधील अथेन्स येथे नुकतीच द थिएटर ऑफ चॅलेंज या जगप्रसिद्ध ॲक्टिंग स्कूलच्या वतीने १८ वा आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल ऑफ मेकिंग थिएटर घेण्यात आला. या फेस्टिव्हलसाठी थिएटर वर्कशॉप टीचर म्हणून जगभरातून आठ शिक्षकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील नेर येथील डॉ. मंगेश बनसोड यांचा समावेश होता. बनसोड यांनी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या ३६ विविध देशांतील विद्यार्थ्यांना मराठमोळ्या तमाशाचे धडे दिले. गण-गौळणीसह बतावणीचा आगळावेगळा फॉर्म जगभरातून आलेल्या या विद्यार्थ्यांना भलताच भावला.

डॉ. मंगेश बनसोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील. सध्या मुंबई विद्यापीठातील अकादमी ऑफ थिएटर आर्ट या विभागात ते असोसिएट प्रोफेसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयाेग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य म्हणूनही ते काम पाहत आहेत. मागील १८ वर्षांपासून ग्रीसमधील अथेन्स येथे द थिएटर ऑफ चॅलेंज या जगप्रसिद्ध ॲक्टिंग स्कूलच्या वतीने फेस्टिव्हल ऑफ मेकिंग थिएटरचे आयोजन केले जाते. या फेस्टिव्हलसाठी जगभरातील विविध देशातून विद्यार्थी सहभागी होतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्कशॉप टीचरची निवड केली जाते.

यंदाच्या फेस्टिव्हलसाठी जगभरातून १३ शिक्षकांची निवड करण्यात आली होती. त्यात डॉ. मंगेश बनसोड भारतातून एकमेव होते. अथेन्स येथे झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये ‘महाराष्ट्रातील तमाशामधील अभिनय’ या विषयावर त्यांनी सहभागी विद्यार्थी, तसेच रंगकर्मींना मार्गदर्शन केले. त्यानंतर फ्रान्स, इटली, जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदर्लंड या युरोपातील विविध देशांतील नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनाही भेट देऊन तेथील लोककलांची माहिती घेतली, तसेच महाराष्ट्रातील लोककलेचा समृद्ध वारसा रंगकर्मींना सांगितला.

थिएटरमधील नवीन संकल्पनांवर झाली चर्चा

महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. या लोककलांनी मनोरंजनाबराेबरच समाजाला शिक्षित करण्यासाठी प्रबोधनाची मोठी परंपरा समर्थपणे चालविली आहे. त्यातही तमाशाचे महत्त्व वेगळेच आहे. अस्सल मराठी मातीतील ही लोककला आहे. विविध देशांतील रंगकर्मींना यासंदर्भात माहिती दिली. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या रंगकर्मींनी थिएटरमधील नवीन संकल्पनांवर, विषयांवर चर्चा केली. नव्या तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या बदलांबाबतही संवाद झाल्याचे डॉ. मंगेश बनसोड यांनी सांगितले.

विदेशी विद्यार्थिनींनी नऊवारी नेसून धरला ताल

विविध ३६ देशांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांना महाराष्ट्रातील तमाशा लोककलेबाबत प्रशिक्षण द्यायचे होते. अथेन्सला जातानाच काही नऊवारी साड्या, तसेच तमाशाशी संबंधित साहित्य घेऊन गेलो होतो. ही साडी कशी नेसतात इथपासून तमाशामध्ये लावणीचा फड कसा रंगतो. गण-गौळण, बतावणी काय असते, याचे प्रशिक्षण मी विद्यार्थ्यांना दिले. परदेशी विद्यार्थ्यांना लावणीचा फॉर्म भलताच भावला. अनेकींनी नऊवारी नेसून ताल धरला होता, असेही बनसोड यांनी सांगितले.

Web Title: International Festival in Greece; the students of 36 countries felt the rhythm of the dholak and the voice of ghungroo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.