३० हजार नाण्यांसह पुरातन वस्तूंचा दुर्मिळ खजिना जतन; शृंगार साहित्य आणि बरेच काही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 03:05 PM2022-05-18T15:05:23+5:302022-05-18T15:13:51+5:30
International Museum Day : त्यांच्याकडे आज ३० हजार तांब्याची नाणी, अडीच हजार वर्षांपासूनचा इतिहास सांगणारी आहेत. प्रत्येक शतकात राज्य बदलले, यासोबत त्या ठिकाणचे चलनही बदलले. ही सर्व नाणी त्यांच्याकडे पाहायला मिळतात.
यवतमाळ : भारताचा प्राचीन इतिहास समृद्ध आहे. त्या काळातील विविध वस्तू आजही अनेकांना भुरळ घालतात. त्या काळातील कला आजच्या प्रगत युगातही अनेकांना अवगत झालेली नाही. असा पुरातन वस्तूचा संग्रह नरेश चमेडिया यांच्याकडे आजही पाहायला मिळतो. दोन पिढ्यांचा हा संग्रह थक्क करणारा आहे. ३० हजार नाणी आणि काजळ, कुंकूसह शृंगार साहित्यासह दुर्मिळ खजिना आहे.
स्व, शंकरलाल चमेडिया यांनी १९८६ पासून विविध वस्तूंच्या संग्रहास सुरुवात केली. त्यांचा हा संग्रह पुढील काही वर्षांत थक्क करणारा राहिला. ज्या ठिकाणी प्रवासाकरिता शंकरलाल चमेडिया पोहोचले, त्या ठिकाणावरून प्राचीन वस्तू त्यांनी गोळा केल्या. देशभरातून गोळा केलेल्या या वस्तूंनी आज त्यांचे घर समृद्ध झाले आहे. त्यांचा मुलगा नरेश चमेडिया यांनीदेखील वडिलांच्या छंदाला जोपासत समृद्ध वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न ठेवला आहे.
त्यांच्याकडे आज ३० हजार तांब्याची नाणी, अडीच हजार वर्षांपासूनचा इतिहास सांगणारी आहेत. प्रत्येक शतकात राज्य बदलले, यासोबत त्या ठिकाणचे चलनही बदलले. ही सर्व नाणी त्यांच्याकडे पाहायला मिळतात, याशिवाय सातवाहन आणि त्यापूर्वीच्या काळापासूनची सुवर्ण नाणी त्यांनी जतन केली आहेत.
मोगल काळातील नाणीही त्यांच्या संग्रहालयात आहेत. मित्र आणि भद्र राज्याची दीडशे नाणी, गुप्त, कुश, कुशात, सिबक, क्षत्रेय, वाकाटक, यादव, गोंड राजे, बहामनी, मुघल, शिवाजी, पेशवे, मराठा, भोसले, ईस्ट इंडिया कंपनी यांची दुर्मिळ नाणी त्यांनी संग्रहित केली आहेत. त्यांच्याकडे प्राचीन काळातील शृंगार साहित्य पाहायला मिळते. यात बांगड्या, अंगठ्या, पैंजण, कडे याच्यामध्ये असलेली शस्त्रे अशा सुरेख कलाकृतीच्या वस्तू त्यांनी संग्रहित केलेल्या आहेत. आता आपल्याकडे असणारी अंगघासणी त्याकाळी पितळीपासून बनविलेली आहे.
विशेष म्हणजे यामध्ये खंजिरीसारखा वापर करण्यात आला आहे. अंघोळ करताना एखादे गाणे गुणगुणत असेल तर त्याला या अंगघासणीसोबत गाण्याचाही आनंद मिळविता येतो, अशी सुरेख उपाययोजना यामध्ये आहे. याशिवाय त्या काळात प्रकाशासाठी दिवे म्हणून कंदील वापरले जात होते. नानाविध प्रकारचे पक्ष्यांच्या आकाराचे दिवे त्यांच्याकडे पाहायला मिळतात. त्यावर सुरेख कलाकृती करण्यात आली आहे.
शृंगार मूर्ती तर अतिशय कलाकारीपूर्ण पाहायला मिळते. यामध्ये आरसा, कुंकू आणि विविध साहित्य ठेवण्याची व्यवस्था आहे. याशिवाय लिखाण काम करताना पेन आणि दौत असलेल्या अनेक वस्तू त्या ठिकाणी आहेत. शिकारीसाठी वापरले जाणारे कलाकृती पूर्ण भाले त्यांच्या संग्रहालयात आहेत. प्राचीन काळातील घड्याळ या ठिकाणी पाहायला मिळते. अर्ध्या इंचापासून ते तीन-चार फुटापर्यंतच्या विविध वस्तू त्यांच्या संग्रहालयाच्या खजिन्यात आहेत. विविध प्रकारचे कुलूप, मनोरंजन साहित्य याचा खजिनाच त्यांच्याकडे जतन केलेला आहे.
दोन पिढ्यांचा हा खजिना आम्ही जतन केला आहे. आता हा खजिना नगर परिषदेला देण्याची इच्छा आहे. नगर परिषदेमध्ये अशा वस्तूंचे संग्रहालय असावे. यामुळे समृद्ध वारसा येणाऱ्या पिढीलाही कळेल. त्यासाठी नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. यवतमाळच्या नगर भवनात या वस्तू ठेवल्या तर यवतमाळच्या प्राचीन इतिहासाला उजाळा मिळेल.
- नरेश चमेडिया, यवतमाळ.