यवतमाळात आंतरराष्ट्रीय सिन्थेटिक ट्रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:00 PM2018-08-13T22:00:09+5:302018-08-13T22:00:28+5:30
येथील नेहरु स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक (धावपथ) साकारण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ट्रॅकसाठी ६ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. १५ आॅगस्टनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
नीलेश भगत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नेहरु स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक (धावपथ) साकारण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ट्रॅकसाठी ६ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. १५ आॅगस्टनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
नऊ महिन्यात हा ट्रॅक पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सदर ट्रॅक आंतरराष्ट्रीय अॅथ्लेटीक्स फेडरेशनच्या मानकानुसार तयार केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व चिनी अभियंत्यांनी नेहरु स्टेडियमला नुकतीच भेट देऊन जागेची पाहणी केली. हा ट्रॅक जिल्हा क्रीडा संकूल समितीस हस्तांतरित करण्यात येणार असून त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी समितीकडे राहणार आहे. सिन्थेटिक ट्रॅक झाल्यावर धावपटूंना भरपावसातही सराव करणे शक्य होणार आहे.
फुटबॉल मैदानही होणार
ट्रॅकच्या आतील बाजूस कृत्रिम गवताचे फुटबॉल मैदान तयार केले जाणार आहे. मैदानावर पाणी शिंपडण्याकरिता कृत्रिम गवताच्या खाली हायड्रोलिक स्प्रिंकलर लावण्यात येईल. विशिष्ट दाब देऊन तुषार सुरू केले जातील.
या आधुनिक मैदानामुळे जिल्ह्यातील फुटबॉल पटूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी येथेच सराव करणे शक्य होणार आहे.
विदर्भातील तिसरा ट्रॅक
यवतमाळात होणारा हा सिन्थेटिक ट्रॅक विदर्भातील तिसरा असणार आहे. मानकापूर (नागपूर) येथे हा ट्रॅक असून चंद्रपुरात त्याचे काम सुरू आहे.
असा असेल ट्रॅक
सिन्थेटिक ट्रॅक तीन लेअरचा असेल. पहिल्या थरामध्ये संपूर्ण ट्रॅक खोदून खडीकरण व डांबरीकरण होईल. त्यावर पॉलियरेथेनचे कोट लावल्या जाईल. दुसऱ्या थरामध्ये ट्रॅक स्वच्छ करून त्यावर एसबीआर रबर कोटींग, त्यावर लाल व दाणेदार माती टाकली जाईल. तिसऱ्या थरामध्ये ईपीडीएम ग्रॅन्यूल्सचे कोटींग व त्यावर सहा किंवा आठ लेनचे मार्किंग केले जाणार आहे.