प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा; ५० हजारांचे बक्षीस देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:36 IST2024-12-12T17:35:50+5:302024-12-12T17:36:54+5:30

Yavatmal : तालुकास्तर, जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावरही शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार

intra-state crop competitions to encourage experimental farmers; 50 thousand will be given as a reward | प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा; ५० हजारांचे बक्षीस देणार

intra-state crop competitions to encourage experimental farmers; 50 thousand will be given as a reward

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगामातील पीक स्पर्धेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचा आहे. यात विजेत्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे.


ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात चालान भरावे लागणार आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी ३०० रुपये, तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांना १५० रुपयांचे चालान भरावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची स्वतःच्या नावाने जमीन असणे आवश्यक आहे. ती जमीन स्वतः कसणे आवश्यक आहे. एकावेळी एका शेतकऱ्याला विविध पिकांच्या स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे. या स्पर्धेसाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 


ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर राबविली जाणार आहे. यात प्रत्येक स्तरावर शेतकऱ्यांना तीन विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. शेतशिवारामध्ये अधिक उत्पन्न घेण्यासाठी विविध क्षेत्रात विविध पद्धतीचा अवलंब केला जातो. यातून अनेकांना लाभ होतो, तर काहींना तोटाही होतो. यातील योग्य पद्धती कोणती आहे, याची माहिती स्पर्धा राबविल्यामुळे सर्वांनाच कळणार आहे. याशिवाय अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना स्पर्धा राबविल्यामुळे प्रोत्साहन मिळून असे शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून बदलण्यास मदत होईल. सोबतच कमी खर्चाच्या आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या बाबीदेखील शेतकऱ्यांना कळतील. 


तालुका ते राज्यस्तरावर होणार स्पर्धा
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे दिली जाणार आहेत. यात संबंधित सातबाऱ्यावर घोषित केलेल्या क्षेत्रावर तसे पीक असणे आवश्यक आहे.


प्रोत्साहन अन् प्रसिद्धीही 
कृषी वार्ता फलकावर याची माहिती दिली जात आहे. शेतकरी गट आणि कृषी सहायकाच्या माध्यमातूनही गावपातळीवर ही माहिती देण्यात आली आहे.


एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न 
या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी कुठले तंत्र वापरले, याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.


३१ डिसेंबरपर्यंतची मुदत 
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.


अर्ज कुठे करणार? 
शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात अर्ज भरायचा आहे. सोबत सातबारा, आठ-अ, चालान, आधार कार्ड जोडायचे आहे. आदिवासी असेल तर जातप्रमाणपत्र लागणार आहे.


किती रुपयांचे बक्षीस आहे 
तालुकास्तरावर ५, ३, २ हजारांची तीन बक्षिसे, जिल्हास्तरावर १०, ७, ५ अशी तीन, तर राज्यस्तरावर ५०, ४०, ३० अशी बक्षिसे असणार आहेत.

Web Title: intra-state crop competitions to encourage experimental farmers; 50 thousand will be given as a reward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.