रात्री चार्जिंगला लावली होती इन्व्हर्टर बॅटरी, दुकान उघडताच झाला स्फोट; मेकॅनिकचा मृत्यू
By सुरेंद्र राऊत | Published: March 28, 2024 09:35 AM2024-03-28T09:35:46+5:302024-03-28T09:36:39+5:30
यवतमाळच्या आर्णी येथे पहाटे तीन वाजताची घटना
राजेश कुशवाह, आर्णी (यवतमाळ): शहरातील माहूर चौकात इन्वर्टर बॅटरी व सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्तीचे दुकान आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजता मेकॅनिकने दुकान उघडले, त्या क्षणी चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाला. यात मेकॅनिक काही फूट अंतरापर्यंत फेकला गेला आणि गंभीर जखमी झालेल्या त्या मेकॅनिकचा मृत्यू झाला. तस्किल शेख वकील (35, रा. शास्त्रीनगर आर्णी) असे मृताचे नाव आहे.
तस्किल हा अनेक वर्षापासून इन्वर्टर बॅटरी दुरुस्ती व सीसीटीव्ही बसविण्याचे काम करत होता. त्याच्याकडे दुरुस्तीला आलेल्या बॅटरी तो रात्री चार्जिंगला लावत असे, रमजानचा महिना असल्याने तस्कील शेख वकील याने रोजा ठेवला होता. गुरुवारी पहाटे तीन वाजता तो रोजा सोडण्याठी उठला व व नंतर माहूर चौकातील दुकानाकडे निघाला. त्याने दिवसाच्या लावलेल्या बॅटरी चार्जिंग वरून काढण्यासाठी दुकान उघडले मात्र दुकान उघडताच अघटीत घडले. अचानक बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात तस्किल हा दहा फुट अंतरापर्यंत हवेत फेकल्या गेला यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिक धावून आले. बॅटऱ्याचा स्फोट इतका भीषण होता, की आजूबाजूच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने आर्णी शहरात खळबळ उडाली आहे.