मृत्यूदर वाढण्याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:49+5:302021-04-17T04:40:49+5:30
समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून जिल्ह्यात सुरुवातीचे तीन महिने एकही मृत्यू झाला नव्हता, असा दावा केला. ...
समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून जिल्ह्यात सुरुवातीचे तीन महिने एकही मृत्यू झाला नव्हता, असा दावा केला. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी होती. संसर्ग रोखण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्या उपाययोजना केल्या होत्या. परिणामी, पॉझिटिव्ह रुग्ण कमी आढळून येत होते; मात्र याचा ताण यंत्रणेवर पडत असल्यामुळे यंत्रणा त्यांच्या विरोधात गेली. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांची मुदतपूर्व बदली केली. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे जाळे पूर्णत: कोलमडल्याचा आरोप नरवाडे यांनी केला.
नवीन जिल्हाधिकाऱ्यांना कामाचा अनुभव कमी आहे. यंत्रणेवर त्यांची कमांड नाही. त्यामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन होत नाही. परिणामी, जनतेचे आरोग्य आणि जीव धोक्यात आले आहे. आरोग्य विभागामध्ये अजूनही ७४ हजार अँटीजन किट, आरटीपीसीआर किटचा ताळमेळ जुळत नाही. टेस्टिंगकरिता वापरावयाच्या किटची स्थिती लपवण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात टेस्टिंगमध्ये शिथिलता आली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण अतिशय धोक्याच्या वळणावर येऊन पोहोचत आहे. आता ऑक्सिजन वेळेवर मिळत नसल्याने मृत्यू होत आहे. या प्रकाराची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.