गांजा शेती प्रकरणातील तपास मंदावला, पाच आरोपींवर थांबले पोलिस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 05:07 PM2023-10-18T17:07:39+5:302023-10-18T17:08:08+5:30
तपासातील त्रुटीचा होऊ शकतो आरोपींना फायदा
संजय भगत
महागाव (यवतमाळ) : घोणसरा येथील गांजा शेतीचे प्रकरण सुरुवातीला ज्या पद्धतीने हाताळण्यात आले होते, त्या ताकतीने कार्यवाही होताना दिसत नाही. आवश्यक असलेल्या तपासातील अनेक बाबी नजर अंदाज करण्यात आल्या आहेत. केवळ पाच आरोपीवर कार्यवाही थांबल्यामुळे सध्यातरी प्रकरणातील हवाच निघून गेल्याचे मानले जात आहे.
ज्या पोलिस ठाण्यांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेमार्फत कार्यवाही केली जाते, अशावेळी बहुतांश प्रकरणात संबंधित ठाणेदारांना शोकाॅज नोटीस बजावली जाते. या प्रकरणात मात्र असे काही झालेले दिसत नाही. उलट २५ लाखांच्या वर किमतीचा तपास ग्रामीण ठाणेदाराकडे देण्यात आला आहे. याचेच पोलिस वर्तुळात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. पाचशे किलोपेक्षा जास्त गांजा आणि २५ लाखांच्या वर अमली पदार्थ मालाची किंमत असलेल्या प्रकरणातील तपासाचे काही मार्गदर्शक तत्त्व आहेत. त्याचे या प्रकरणात पालन केल्या जात नाही, असा काहीसा सुर अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.
प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये सहभागी असलेल्या पुसद ग्रामीण पोलिस अधिकाऱ्याकडे हा जंगी तपास सोपवण्यात आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाचे उत्पादन घेतले जात होते, त्याची विक्री कुठे केली जात होती, अजून या प्रकरणात कोण कोण आरोपी आहेत, याचा उलगडा अजून झालेला नाही. मध्यंतरी तपास अधिकारी काही दिवस रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. आरोपी ढाकरे बंधू यांच्या नावे परिसरामध्ये शेती असून त्यांच्या नावे सातबारा आहे. मात्र यातील दुसरे आरोपी राठोड बंधू यांच्या नावे काळी दौ. मोहदी, घोणसरा या परिसरात शेती नाही किंवा त्यांच्या नावे सातबारा नाही, अशी माहिती महसूल सूत्राकडून मिळाली आहे.
भाजलेल्या ‘ताज’बाबत गुप्तता का?
प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये सहभाग असलेल्या पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याकडे प्रकरणाचा तपास दिला जाऊ शकतो का? यावर जाणकार पोलिस अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता आहे. तपास कोणाकडे असावा याबाबत कायदेशीर आणि न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असल्याचे सांगितले जात आहे. गांजा शेतीमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीत सहभाग असलेला स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस कर्मचारी ' ताज ' नेमका कशाने भाजला याचा अजूनही खुलासा पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला नाही. तो दहा दिवसापासून नांदेड येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तो कशाने भाजला हे अजूनही रेकॉर्डवर आलेले नाही. परिसरातील अनेक शेतातील गांजाची झाडे उपटून ती परस्पर नष्ट करण्यात आल्याचे सांगितले जात असून गांजाची झाड पेटवलेली असताना अचानक आगीचा लोळ ' ताज ' यांच्या चेहऱ्यावर आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये त्याचे दोन्ही हात भाजले असण्याची शक्यता आहे. गांजा प्रकरणाची गुंज येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये ऐकायला मिळणार आहे.