‘मैत्रेय’द्वारा फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची न्यायासाठी धाव
By admin | Published: March 12, 2016 02:53 AM2016-03-12T02:53:46+5:302016-03-12T02:53:46+5:30
मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि. व मैत्रेय प्लॉटर्स अॅन्ड स्ट्रक्चरर्स प्रा. लि. यवतमाळ शाखेमध्ये कंपनी व शेकडो एजंटांमार्फत फसवणूक झालेले गुंतवणूकदार ग्राहक,
यवतमाळ : मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि. व मैत्रेय प्लॉटर्स अॅन्ड स्ट्रक्चरर्स प्रा. लि. यवतमाळ शाखेमध्ये कंपनी व शेकडो एजंटांमार्फत फसवणूक झालेले गुंतवणूकदार ग्राहक, एजंट, मैत्रेय अन्याय निवारण संघर्ष समितीचे मुख्य संयोजक नगरसेवक दत्ताभाऊ कुळकर्णी यांच्या नेतृत्वात सोमवार, १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटणार असून त्यांच्याकडे न्यायासाठी साकडे घालणार आहेत.
गुंतवणुकीसाठी कंपनीने नियुक्त केलेल्या एजंटांनी नागरिकांना प्रोत्साहन दिले. कंपनीने एजंट लोकांना भरपूर कमिशन दिले. परंतु यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय, पानठेला चालक, कारकून, सेवानिवृत्त कर्मचारी, निराधार योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, शासकीय कर्मचारी आदींनी आपला घामाचा पैसा, मैत्रेयमध्ये गुंतविला. परंतु कंपनीने पोबारा केला आहे. या कंपनीवर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फसवुणकीचे गुन्हे दाखल आहेत. कंपनीच्या मुख्य संचालिका वर्षा सत्पाळकर व स्थानिक व्यवस्थापक संजय दहीसकर (यवतमाळ) हे न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती दत्ताभाऊ कुळकर्णी यांनी दिली आहे. मैत्रेयच्या गुंतवणूकदारांनी आपल्या हक्कासाठी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी दहा वाजता मैत्रेय संघर्ष समिती, दत्ता कुळकर्णी जनसंपर्क कार्यालय, स्वस्तिक चौक, गोधणी रोड, यवतमाळ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मैत्रेय अन्याय निवारण समितीने केले आहे. (प्रतिनिधी)