एमआयडीसीत गुंतवणुकीचे गाजर, उद्योगांची मात्र वाणवाच
By Admin | Published: August 13, 2016 01:20 AM2016-08-13T01:20:17+5:302016-08-13T01:20:17+5:30
एकीकडे जिल्ह्यात साडेदहा हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित ११ विशाल प्रकल्पांमध्ये होणार आहे.
सुहास सुपासे यवतमाळ
एकीकडे जिल्ह्यात साडेदहा हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित ११ विशाल प्रकल्पांमध्ये होणार आहे. तर दुसरीकडे सुरू असलेले उद्योग अखेरची घटका मोजत आहे. अशा सर्व उद्योगांना नवसंजिवनी देणे गरजेचे आहे. नवीन उद्योगांसोबतच आहे ते लघुउद्योग कसे टिकतील आणि वाढतील तसेच स्थानिक बेरोजगार उद्योजकतेकडे कसा वळेल यासाठी शासनाचे ठोस कार्यक्रमच नाही, ज्या काही योजना आहेत त्यांची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही.
जिल्ह्यात सध्या यवतमाळ, वणी, पुसद, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, महागाव, कळंब व उमरखेड आदी ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वसाहती आहेत. परंतु यवतमाळ, वणी, उमरखेड व पुसद आदी काही ठिकाणे सोडल्यास इतरत्र मात्र उद्योगांची वाणवा आहे. त्याला कारणही तसेच आहेत. एमआयडीसीमध्ये आवश्यक त्या सोयी-सुविधांचा अभाव आहे. वीज, पाणी, रस्ते, सुरक्षा आदी महत्वाच्या सोयीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही. प्रत्येक ठिकाणी असलेले भूखंड अनेकांनी उद्योगाविना ताब्यात ठेवले आहे. नियमानुसार पाच वर्षात त्या ठिकाणी उद्योग न उभारल्यास एमआयडीसी भूखंड परत घेऊ शकते. परंतु ती प्रक्रियासुद्धा किचकट आणि वेळखाऊ आहे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात भूखंड परत घेतले आहेत. १५३ भूखंड धारकांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. ६८ भूखंड धारकांना उद्योग संजीवणी योजनेअंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. परत घेतलेल्या भुखंडांचे पुन्हा वितरणसुद्धा सुरू आहे. संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत आहे. परंतु अद्यापही स्थानिक उद्योजक ज्या पद्धतीने तयार व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. माहितीचा अभाव याचे कारण आहे. वसाहती सुरू करून उद्योगाला चालना मिळणार नाही, तर आवश्यक त्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे.
भविष्यात मोठे प्रकल्प जिल्ह्यात प्रस्तावित असले तरी सध्या मात्र केवळ तीन विशाल प्रकल्प चालू आहेत. यामध्ये रसोया प्रोटीन, डेक्कन शुगर व रेमन्ड युको डेनिम प्रा. लि. चा समावेश आहे. या तीन घटकांमार्फत ७६० कोटींची गुंतवणूक झाली असून २७५० लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात एकूण प्रस्तावित असलेल्या ९१ मोठ्या उद्योगांपैकी २१ मोठे उद्योग उत्पादनात आहे. त्यांच्यामार्फत १४१६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ४१२४ लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यापैकी तीन हजार ५३२ स्थानिक कर्मचारी आहेत. ९१ पैकी उत्पादन सुरू झालेले २१ मोठे उद्योग सोडून उर्वरित ७० पैकी ६७ मोठ्या उद्योगांमध्ये पाच हजार ३२२ कोटी गुंतवणुकीद्वारा १४ हजार १२८ लोकांना रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ८७८ सुक्ष्म व लघु उद्योजगांना नोंदणी देण्यात आली असून त्यामध्ये ४६८ कोटी रुपयांची यंत्रसामुग्रीमध्ये गुंतवणूक झाली.