गुंतवणूकदार पोलीस ठाण्यावर

By admin | Published: July 8, 2014 11:40 PM2014-07-08T23:40:56+5:302014-07-08T23:40:56+5:30

ठेवी परत मिळाव्या, यासाठी येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांनी मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यावर धडक दिली. वारंवार चर्चा करूनही रक्कम मिळत नसल्याने खातेदारांनी

Investor Police Station | गुंतवणूकदार पोलीस ठाण्यावर

गुंतवणूकदार पोलीस ठाण्यावर

Next

राळेगावातील प्रकार : महिला पतसंस्थेच्या ठेवी परत देण्याची मागणी
राळेगाव : ठेवी परत मिळाव्या, यासाठी येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांनी मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यावर धडक दिली. वारंवार चर्चा करूनही रक्कम मिळत नसल्याने खातेदारांनी या पतसंस्थेच्या व्यवस्थापनाविषयी रोष व्यक्त करीत नारेबाजी केली. पोलीस ठाण्याच्या आवारात हजारो नागरिकांची गर्दी झाली होती.
या पतसंस्थेने गेली काही दिवसांपासून गुंतवणुकीची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. दरम्यान तहसीलवर मोर्चा नेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी अंकेक्षकामार्फत लेखी परीक्षण करून रक्कम देण्याविषयी कारवाई करण्याचे आश्वासन सहायक निबंधकांनी खातेदारांना दिले होते. प्रत्यक्षात याची पूर्तता झाली नाही. दरम्यान पतसंस्था अध्यक्षांना घेराव घालण्यात आला. त्यावेळी सोमवार ७ जुलै रोजी रक्कम मिळण्याविषयी लेखी घेण्यात आले. यानुसार खातेदार सोमवारी कार्यालयावर धडकले. त्यावेळी पदाधिकारी अथवा कर्मचारीही पतसंस्थेत नव्हते.
संस्थेच्या अध्यक्ष कापसी या गावी असल्याचे समजताच खातेदार तेथे पोहोचले. तेथून राळेगावला आले. याठिकाणी दिवसभर चर्चा झाल्यानंतरही पैसे देण्याविषयी ठोस निर्णय झाला नाही.
मंगळवार ८ जुलैला सकाळपासून संस्थेच्या अध्यक्ष लताताई बनकर आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र निर्णय झाला नसल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. याठिकाणी तहसीलदार सुरेश कव्हळे, पोलीस निरीक्षक पी.एन. डोंगरदिवे आदींच्या उपस्थितीत पतसंस्था पदाधिकारी आणि खातेदारांमध्ये झालेली चर्चाही निष्फळ ठरली. संस्थेविरोधात खातेदारांनी नारेबाजी केली. कुठल्याही निर्णयाशिवाय खातेदारांना परत जावे लागले. या पतसंस्थेत विविध घटकातील लोकांनी गुंतवणूक केली आहे. मात्र पदाधिकाऱ्यांनी पैसा देण्यास टाळाटाळ चालविल्याने ते अडचणीत आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Investor Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.