सोन्याचे भाव घसरल्याने गुंतवणूकदार अडचणीत
By admin | Published: June 8, 2014 12:12 AM2014-06-08T00:12:21+5:302014-06-08T00:12:21+5:30
सोने खरेदीत गुंतवणूक करणार्यांची संख्या पुसद तालुक्यात मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु सध्यस्थिती गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये दररोज होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आहे.
पुसद : सोने खरेदीत गुंतवणूक करणार्यांची संख्या पुसद तालुक्यात मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु सध्यस्थिती गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये दररोज होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आहे.
या वेळी खरिपाच्या लागवडीचा हंगाम जवळ येऊन ठेपला असला तरी शेतकरी हे आपल्याकडे असलेले सोने मोडीसाठी सराफा बाजारात येत नसल्याने त्यातून मिळणारा फायदा सराफांना होत असल्याचे आज तरी दिसून येत नाही. सोन्यात गुंतवणूक करून आपल्या पैशात वाढ करण्याची हौस अनेकांना असते. अनेक जण आपली संपत्ती सोने खरेदी करून अधिक वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. गेल्या काही वर्षांपूर्वी सोन्याचा भाव सतत वाढत होता. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला मोठा आर्थिक लाभ होऊ शकेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना होती. त्यामुळे त्यांनी सोने खरेदीत मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. परंतु केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आणि जागतिक बाजारातील घडामोडीनंतर सोन्याच्या भावामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. याचा धसका गुंतवणूकदारांनी घेतला आहे.
सध्या २७ हजार २00 रुपये प्रति तोळ्यापर्यंत सोन्याचे भाव घसरले आहे. चांदीच्या भावातही घसरण आली आहे. सातत्याने सोन्या-चांदीच्या भावामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चेहरेही पडले आहेत. सोने खरेदीदारांसाठी मात्र सध्या चांगले दिवस आहे. विशेष म्हणजे या वेळी शेतकरी आपल्याकडे असलेले सोने हे खरीप हंगामाची पेरणी जवळ आली असतानाही मोडत नसल्याने मोडीतून मिळणारा फायदाही सराफा व्यापार्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे.
यावर्षी अतवृष्टी गारपिटीमुळे संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली. या नुकसानीची जी काही भरपाई शेतकर्यांना शासनाकडून मिळाली आहे. त्यामध्ये काही कर्जाची रक्कम टाकून खरीप हंगामासाठी शेतकर्यांनी तयारी चालविली आहे.
विनाकारण कमी भावात सोने विकण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही. एरवी शेतकरीही आपल्याकडे शेतीमाल आल्यानंतर त्याच्या विक्रीतून दागिने खरेदी करतात आणि पेरणीच्या हंगामात तिच दागिने विक्रीस काढतात. या वेळी दागिने मोडण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सराफा व्यापार्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)