ब्राह्मणगावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:40+5:302021-06-19T04:27:40+5:30
उमरखेड : कोपरगाव-औरंगाबाद ते माहूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्राह्मणगावाजवळ पावसाच्या पाण्याने तलावाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत ...
उमरखेड : कोपरगाव-औरंगाबाद ते माहूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्राह्मणगावाजवळ पावसाच्या पाण्याने तलावाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.
सध्या या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या महामार्गावरील ब्राह्मणगाव बसस्टँडजवळ जवळपास २० बाय २५ आकाराचा २ ते ३ फूट खोलीचा शेततळ्याच्या आकाराचा छोटा तलाव निर्माण झाला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने तेथील लहान, मोठ्या व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तेथे रस्त्याच्याकडेला असलेल्या भुसार व इतर व्यावसायिकांनी रस्ता बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली; मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.
आता या वर्दळीच्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरु असल्याने आधीच मुरूम टाकलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुचाकी व ऑटोरिक्षासारखी वाहने घसरून वाहनधारकांना दुखापती होत आहेत. याच रस्त्यावर ऐन वर्दळीच्या ठिकाणी तलावाची निर्मिती झाली आहे. संबंधित वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेऊन रस्त्यावर त्वरित मुरुम टाकावा, अशी मागणी होत आहे.